Thursday, May 24, 2007

आठ वर्षांनी ...

महाराष्ट्राचे अत्यंत लाडके लेखक पु . ल. देशपांडे यांना जाऊन येत्या जून मध्ये सात वर्षें होतील.
गेल्या सात वर्षांत त्यांच्या स्मरणार्थ , त्यांच्या एकूण कारकीर्दीचा मागोवा , आढावा घेणारी , त्यांचा आठवणींना उजाळा देणारी , त्यांच्या अप्रकाशित लेखनाची अनेक पुस्तके आली आणि ही सर्व पुस्तके उत्तम खपली. पु. लं. ची कितीतरी जुनी पुस्तके , गाणी , नाटके या गेल्या सात वर्षांत अगदी चांगली खपली ; आणि हा ट्रेंड थांबण्याची चिन्हे नाहीत.

पु. लं. ची हिमालय-सदृष्य सावली गेल्या शतकाच्या शेवटच्या चार -पाच दशकांवर पडली. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य उणीपुरी पन्नास वर्षे ते हयात असतानाच तळपत होता. हा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे.
आज सात वर्षांनी , ही सावली दूर गेल्यानंतर , त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या त्यांच्या प्रेमाच्या पुराची लाट किंचितशी ओसरल्यासारखी झाल्यानंतर त्यांच्या आपल्या आताच्या आयुष्याशी राहिलेल्या नात्याबद्दल आपल्याला काहीशा समतोलपणे बोलता येईल असे वाटते. त्यांच्याबद्दलचा "रेव्हरंस" लोपलेला नाही ; परंतु त्यांच्या "रिलेव्हन्स" बद्दल बोलावे इतपत काळ उलटला आहेसे वाटते.

त्यांच्या लिखाणाकडे मागे वळून पहाताना, काही प्रश्नांचा धांडोळा घ्यावासा वाटतो ...आपल्या सध्याच्या जगण्याच्या संदर्भात पु. ल. कुठे उभे आहेत? त्यांच्या लिखाणातील काय काय अजूनही आवडते ? काय काय मार्मिक वाटते ? "ओल्ड रेलीक" वाटावा असा कुठला भाग वाटतो ? एकंदर जगण्याबद्दलचे त्यांचे कुठले विचार चिरकाल टिकून आहेत असे वाटते ?

माझ्या प्रश्नांची दिशा थोडीशी तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित आहे. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही. पण "तुझे आहे तुजपाशी" सारख्या कृतींतून उघडउघड तर अन्य ललित लिखाणांतून प्रच्छन्नपणे त्यांच्या जगण्यबद्दलच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडले आहे.

मराठी मनावर या वृत्तीचा नक्कीच प्रभाव पडत आला आहे. गेल्या काही पिढ्या याची साक्ष देतील. बदलत्या काळात, पु. लं. च्या पश्चात, त्यांनी स्वीकारलेली कुठली मूल्ये टिकतील ? पु. ल. कितपत "रेलेव्हंट" वाटतील ? आणि जर का त्यांचा ठसा पुसट होत असेल तर , त्यांनी स्वीकारलेल्या जगण्याबद्दलच्या दृष्टिकोनातील कुठला भाग कालातीत होता काय ?

पुलंच्या लिखाणातील काही गोष्टींचा या निमित्ताने परामर्श घ्यावासा वाटतो.

स्मरणरंजन : इंग्रजीत ज्याला नॉस्टाल्जिया म्हणतात त्याचे दर्शन पुलंच्या जवळजवळ प्रत्येक लिखाणात दिसेल. त्यांच्या लेखक म्हणून ऐन बहरात असण्याच्या कालात या मुद्द्याचे अपील खूप मोठे होतेच ; पण ऐंशी-नव्वदीच्या दशकात जेव्हा पुलंनी जवळजवळ लेखनाच्या मुख्य प्रवाहापासून संन्यास घेतला होता, त्या काळातील पिढ्यांवर सुद्धा , या स्मरणरंजनाचा प्रभाव कमी नव्हता. बालगंधर्व, पुलंचे आजोबा, अगदी बोरकरसुद्धा ..... या साऱ्यांना कधीही न पाहिलेली मंडळी त्याना पहात होती पुलंच्या चष्म्यातून. वसंतराव देशपांडे , केसरबाई केरकर यांसारख्यांना या पिढीतील लोकांनी ओझरते पाहिले असेलही ; पण ते त्यांच्या उतारवयात , कारकीर्द आटोपताना. पण त्यांची व्यक्तिचित्रे अगदी अलिकडील पिढ्यांमढ्ये लोकप्रिय होती.
पुलंच्या अस्तानंतर या स्मरणरंजनाची जादू लोप पावत असल्यासारखी का वाटत असेल? माझ्या मते, त्याचे एक उत्तर असे असेल की, पुलंच्या अस्तानंतर जवळजवळ लगेच, त्यांना पाहिलेल्यांची, त्यांच्याबरोबर काम केलेल्यांची , त्यांचे कर्तृत्त्व घडताना ते अनुभवणाऱ्यांची पिढीच काळाच्या पडद्याआड गेली. हे संक्रमण जास्त जाणवले ते पुलंच्या एक्झिटमुळे. याचा अर्थ या पिढीतील सर्वच्या सर्व माणसे इतक्या थोड्या कालावधीत देवाघरी गेली, असा कुणी शब्दशः अर्थ काढू नये. पण ही पिढी जीवनाच्या क्रीडांगणातून निवृत्त होत गेली आणि पुलंच्या लिखाणातील स्मरणरंजनाच्या एका मोठ्या भागाचे संदर्भ विरल्यासारखे झाले असे मला वाटते.

भाषेची एकूण सांस्कृतिक संदर्भातील स्थिती, तिचे वाङ्मयव्यवहारातील आणि मुख्य म्हणजे एकूण सामाजिक, राजकीय व्यवहारातील स्थान हे सर्व प्रश्न गुंतागुंतीचेच. मराठी सारस्वतात आता जे काही थोडे लोक राहिले आहेत त्यांच्यामधे हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे यात शंका नाही. पण केवळ एका अत्यंत लोकप्रिय दिवंगत लेखकाबद्दलच नव्हे , तर त्या लेखकाने आपल्या लिखाणातून वर्णन केलेल्या जीवनसरणीबद्दल , जगण्याच्या एका भूमिकेबद्दल हा विचार चाललेला आहे.

अलिकडेच मला काही लोकांशी संवाद करताना असे दिसले की,"असामी असा मी" , "बटाट्याची चाळ" यांसारखे ललित लिखाण काही लोकाना संदर्भहीन वाटते. मला व्यक्तिश: तसे वाटत नाही हा भाग अलाहिदा. (किंबहुना, बटाट्याची चाळ मला पुलंची एक स्वतंत्र कलाकृती, जिचे मराठी साहित्यातील स्थान चिरकाल टिकून राहील असे वाटते.) परंतु, हे असे वाटणे या गोष्टीचे निदर्शक आहे की, पुलंचा रिलेव्हन्स तपासणे हे नक्कीच अभ्यसनीय ठरते.

1 comment:

अवधूत डोंगरे said...

या पोस्टवर अजून एकही कॉमेंट नसल्याचं आश्चर्य वाटलं.
'पुलं'बद्दल आठ वर्षं, नऊ वर्षं, दहा वर्षं. . . आणि अशी मराठी जिवंत असेपर्यंतची अनेक वर्षं हे विचार (धांडोळा, परामर्श, इत्यादी.) वारंवार येतच राहातील असं वाटतं.
छान पोस्ट.