Thursday, November 12, 2015

संदीप खरेचं काय करायचं?


रेषेवरची अक्षरेच्या काव्यविषयक अंकाचं काम निघालं आणि गाडी लोकप्रिय कवितेवर आली. गेल्या पंधरा वर्षांचा विचार करताना असं दिसलं की संदीप खरे यांच्या कवितेला मराठी कवितेच्या प्रांतात जितकी लोकप्रियता मिळाली, तितकी अन्य कुठल्याच कवीच्या कामाला मिळालेली दिसत नाही. नव्या कादंबर्‍या आल्या. काही लेखक-लेखिका २००० सालानंतर प्रकाशात आले. काही नवी प्रकाशनं, नियतकालिकं उदयाला आली. पण लोकप्रिय कवितेच्या बाबत खरे यांच्या जवळपास जाणारं काही घडलं आहे, असं जाणवत नाही.

इथे ‘लोकप्रिय’ या विशेषणाचं महत्त्व आहे, हे वेगळं सांगायला नकोच. या विशेषणाला विशिष्ट संदर्भांमध्ये बरे आणि वाईट अर्थ आहेत हेही उघड आहे. साहित्याचा वेध घेणार्‍या कुठल्याही ठिकाणी खर्‍यांच्या कवितेचा अभ्यास सोडा, उल्लेखही येत नाही; आणि गावोगाव (आणि परदेशी) राहत असलेल्या सामान्य रसिकांना या साहित्यिक महात्मतेच्या अभावाची कसलीही क्षिती नाही. खरे यांचे (कुलकर्णी यांजबरोबरचे) मंचीय सादरीकरणाचे कार्यक्रम जोरात चालले आणि चालू आहेत.

खुद्द खरे यांच्या कवितांची खानेसुमारी किंवा समीक्षा ही कितपत महत्त्वाची आहे याहीपेक्षा, वाङ्मयीन महत्ता आणि लोकप्रियता ही जी dichotomy (द्वैत) आहे, ती थोडी अधिक जवळून समजून घेणं मला रोचक वाटतं. आता, ही dichotomy कुठे नाही? वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ती चिरकालापासून चालत आलेली आहे. पण प्रस्तुत व्यासपीठ हे कवितेला वाहिलेलं आहे, म्हणून विचार साहित्य नि कवितेचा करायचा.

ढोबळ मानाने पाहायला गेलं, तर असं म्हणता येईल; की मर्ढेकरांनंतर जे अनेक प्रवाह निर्माण झाले, त्यांत दिलीप चित्रे, वसंत डहाके - आणि कदाचित अरुण कोलटकर (पण कोलटकर फारच स्वयंभू वाटतात. असो. तर तेही) - अशा लोकांचा 'साठोत्तरी' म्हणून गणला गेलेला एक पंथ होता. आरती प्रभू / ग्रेस / ना. धों. महानोर यांच्यासारखे मौज-पॉप्युलर प्रकाशनांनी प्रकाशात आणलेले लोक होते. आणि मग जणू भूकंप व्हावा, तसं दलित साहित्य आणि पर्यायाने विद्रोही कविता आली. ढसाळांसारख्यांनी मराठी विश्वाला गदागदा हलवलं. ग्रामीण कवितेने आपलं अस्तित्व अधोरेखित केलं. हे सर्व ढोबळमानाने सांगण्याचं कारण, की नव्वदच्या दशकात तयार झालेला जो एक पंथ होता - त्यात हेमंत दिवटे, वर्जेश सोलंकी, मन्या जोशी, अरुण काळे, सचिन केतकर आदी लोकांचा समावेश होतो - या गटातल्या लोकांमध्ये आणि संदीप खरे यांच्यामध्ये जो मोठा फरक आहे, त्या फरकाचा संबंध मी वर ज्या वाङ्मयीन महत्ता आणि लोकप्रियता यातल्या dichotomyचा उल्लेख केला तिच्याशी येऊन पोचतो. 'अभिधानंतर' या नव्वदोत्तरी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अनियतकालिकाच्या अनेक लेखांतून संदीप खरे यांच्यावर प्रच्छन्न आणि उघड अशी टीका झाली. संदीप खरे यांना उद्देशून बाजारूपणासारखे शेलके शब्द वापरले गेले. गंमत अशी, की खर्‍यांनी याचा तेव्हा किंवा आता कुठे प्रतिवाद केल्याचं आठवत नाही.

यातल्या नळावरच्या भांडणांबद्दलच्या गॉसिपपेक्षा महत्त्वाचा आहे, तो नव्वदोत्तरी कवींच्या आणि खर्‍यांच्यामधला फरक; त्यांच्या भूमिकांमधला फरक, आणि ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या गोष्टींमधला विरोधाभास. नव्वदनंतर भारतीय अर्थव्यवस्था बदलली आणि भारताच्या समाजावर त्याचे दूरगामी परिणाम झाले; नव्या मध्यमवर्गाचा उदय झाला; शहरीकरण आणि जागतिकीकरण या गोष्टींना प्रचंड वेग आला आणि बदलाच्या या लोंढ्यात राहणीमानाची वीण (social fabric) पार बदलली, हे सर्वज्ञात आहे. या सर्वाचा परिणाम साहित्यावर होणे हेही अपरिहार्य होते. नव्वदोत्तरी कवितांवर त्याचा प्रभाव जाणवतो. या कवितेतला निवेदक हा 'थांबताच येत नाही' असं म्हणतो (हेमंत दिवटे) किंवा 'जफर आणि माझ्यामध्ये लोक विष कालवतात' अशा प्रकारचे विचार बोलून दाखवतो (वर्जेश सोलंकी) किंवा 'लोकलच्या गर्दीत एकमेकांना स्पर्श करण्याची प्रवृत्ती अनिवार होते' अशा आशयावर बोट ठेवतो (मन्या जोशी).

याउलट याच सुमारास (किंवा थोडं पुढे) प्रकाशात आलेले खरे, हे आरती प्रभू / मंगेश पाडगांवकर/ काही किंचित सुरेश भट यांच्याकडून प्रेरणा घेतलेले दिसतात. खर्‍यांच्या कवितेतला निवेदक प्रियेच्या आठवणीने व्याकूळ होतो; किंवा आपण एकटे/कलंदर आहोत, याची खर्‍यांच्या कवितेतल्या निवेदकाला जाणीव होते (मात्र त्याच्या एकटेपणाचा तो तुटलेपणाशी (alienation) किंवा सांप्रतकालीन जगण्याच्या गोचीशी (existential conundrum) संबंध जोडताना दिसत नाही.)

सर्वात गमतीचं साम्य किंवा फरक - किंवा दोन्ही - अशा प्रकारच्या कवितांमध्ये येतो, जिथे कवी अती काम करणार्‍या महानगरी निवेदकाच्या दृष्टीने बोलू जातो. नव्वदोत्तरी निवेदक कंटाळलेला / कटकट करणारा / व्याकुळता (anxiety) व्यक्त करणारा आहे. या सार्‍यामध्ये आपली निर्मितिशीलता घुसमटते आहे, अशा स्वरूपाचे बोल त्या कवितांमधून ऐकू येतात. मात्र खर्‍यांची कविता म्हणते, 'दूर देशी गेला बाबा, माझ्याशी खेळायला येत नाही!' थोडक्यात शहरीकरण, जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण यांच्या नंतरच्या जगतात राहणारे नव्वदोत्तरी नायक समाजाच्या संदर्भातलं, कुटुंबसंस्थांसारख्या गोष्टींच्या बाबतीतलं आपलं स्थान तपासतात; सामाजिक व्यवस्था आणि संकेतांबद्दल तिरकस - क्वचित जळजळीत म्हणावं इतपत धारदार - भाष्य करतात; या व्यवस्था आणि संकेत यांची आडवीतिडवी नासधूस झाल्यानंतरची असंगतता त्यांच्या कवितेतून येते. तर खर्‍यांच्या कवितेतली दु:खं ही स्वप्नरंजनात्मक आहेत, ती या मोडलेल्या ढाच्याबद्दल कुठेही बोलत नाहीत. तिथे अजूनही प्रिया भेटत नाही आणि मुलाला बाप भेटत नाही, वगैरे गुलाबी दु:खं येतात. या कृतक-रोमँटिसिझमच्या पलीकडे जात जेव्हा खरे काहीतरी मांडू जातात, तेव्हा ते अर्थातच अधिक गुणवत्तेचं आहे. परंतु त्यातही कलंदरी, कवीचं गूढरंजनात्मक अस्तित्व वगैरे काहीसे परिचित असलेले वळसे दिसतात. थोडक्यात सांगायचं तर जीवनाचं कुरूप म्हणा, विकृत म्हणा, विकट म्हणा, नाहीतर विक्राळ म्हणा, असं जे रूप आहे; त्याच्याशी कसलंही देणंघेणं नसलेलं खरे यांच्या कवितांचं जग आहे.

खर्‍यांचा विचार करताना मागील पिढीतल्या पाडगांवकर आणि विंदा आणि सुर्वे यांचा विचार येणं अपरिहार्य आहे. खर्‍यांवर टीका करताना आपण हे लक्षात घ्यायला हवं, की काव्यवाचन हा प्रकार त्यांनी आणलेला नाही. त्यांनी ती परंपरा पुढे नेलेली आहे. पाडगांवकरांवरसुद्धा लिज्जत पापडाच्या जाहिराती केल्या म्हणून टीका झाली. खर्‍यांवरच्या टीकेपेक्षा ती पुष्कळ कमी होती, पण थट्टा ही झालीच.

खर्‍यांचा विचार करता-करता आपण अपरिहार्यपणे 'मेनस्ट्रीम', 'पॉप', 'लोकप्रिय' या गोष्टींकडे येतो. हा पिढी बदलल्याचा परिणाम असावा. माझ्या मते पाडगांवकरांच्या या १ टक्का कामावर जितकी टीका नि थट्टा तेव्हा झाली, त्या टीकेचा मागमूससुद्धा आता दिसत नाही. एका अर्थाने, नव्वदनंतरच्या पंचवीसेक वर्षांत कलेच्या क्षेत्रातलं बाजारपेठेचं महत्त्व पटायला, सर्वच क्षेत्रांतल्या 'मार्केटेबल' प्रकारांकडे आपल्याला बोट दाखवता येईल. कलेच्या या मार्केट इकनॉमीमध्ये मग नोस्टाल्जिया - स्मरणरंजनालासुद्धा चांगलाच भाव आहे. राहुल देशपांडे यांच्यासारखे तरुण कलाकार, त्यांच्या कारकीर्दीला दहा-बारा वर्षे झाली तरी त्यांच्या आजोबांची गाणी, नाटकं अधिकाधिक मोठ्या प्रमाणात सादर करतात आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते. काहीसा हाच मामला संदीप खरे यांच्या कवितेबद्दल होताना दिसतो. खरे कविता करताना जी उपमानं योजतात, जे मूड चितारतात; त्यांनी Déjà vu असं वाटणं अपरिहार्य आहे. त्यांच्या संग्रहामधल्या काही कविता रँडम पद्धतीने उघडून वाचताना खालील 'साम्यस्थळं' जाणवली.

संपले अवघे उत्सव आणि गर्दी पांगली
पालखी आता जिण्याची, बघ रिकामी चालली (सुरेश भट)

आता दिवाणखान्यातल्या कोपऱ्यात
जिथे अजूनही तंबोरा आहे (कोन्यात झोपली सतार सरला रंग - गदिमा)

नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार ?
(आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको - वा रा कांत)

दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत
दोघांच्याही ओठांवर एकमेकांची भाषा आहे
दोघांच्याही मनभर एकमेकांच्या शुभेच्छा आहेत
दोघांच्याही डोक्यांवर एकमेकांचे आशीर्वाद आहेत...
झोपेच्या कागदावर जाग्रणाच्या अक्षरांनी मी कविता लिहीत असेन !
तिकडे उगाच असह्य होऊन असोशी ती पाणी पीत असेल...
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र; आणि मी जागाच असेन
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत रहावी नदी तशी तीही जागीच असेल...
मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल... (आरती प्रभू)

एकटा दगडावरी बसुनी कधीच पाहतो
कैक चालून थांबले; पण मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही, शून्य वाटे पंथही
शून्य वाटे साथ कोणी नाही त्याची खंतही
शून्यता ही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ? (आरती प्रभू)

मी काय तुला मागावे, अन काय तू मला द्यावे
छे सखी निराशा कसली मागणीच नव्हती कसली (सुरेश भट)

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते (पाडगांवकर)

अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

वर जे विवेचन आलेलं आहे ते काहीसं स्वयंस्पष्ट आहे. माझ्या मते अधिक रोचक प्रश्न असा आहे की, इतर कवी आणि कवितांच्या रोडावलेल्या खपाच्या किंवा लोकप्रियतेच्या तुलनेत खर्‍यांची राक्षसी म्हणता येईल अशी लोकप्रियता कशी काय? ही लोकप्रियता म्हणजे वर्षानुवर्षं त्याच त्या मालिका पाहणार्‍या वर्गामधली लोकप्रियता म्हणायची की त्यापेक्षा हे वेगळं आहे? असल्यास कसं? खर्‍यांच्या बाबत जो एक मुद्दा वारंवार मांडला जातो - की त्यांनी मराठी तरुण वर्गाला कवितेकडे वळवलं - he made the Marathi poetry a cool thing among the young crowd - हे कितपत ग्राह्य मानता येईल? त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमांची केवळ संख्या, त्यांच्या कवितांना वाहिलेले ब्लॉग्स, दूरचित्रवाणीवर त्यांच्या कवितांचे आणि गाण्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित होणं, कॅसेट्सचा तडाखेबंद खप होणं इत्यादी पाहता, लोकप्रियतेबद्दल शंका राहू नये. आणि त्यातसुद्धा, खरे यांच्यासारख्यांचा उदय आणि त्यांची दीर्घकाल टिकलेली लोकप्रियता, म्हणजे नव्वदच्या दशकापासून विस्तारत गेलेल्या आणि आता या प्रसरणाच्या प्रक्रियेने गती पकडलेल्या आपल्या समग्र मध्यमवर्गीयांच्या आशाआकांक्षांचं पडलेलं प्रतिबिंब आहे, अशा प्रकारचं विधान आपण करू शकतो का?

मला आणखी एक मुद्दा जाणवतो. अन्य संदर्भातल्या 'विकाऊ' गोष्टींचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही, कारण ती ती क्षेत्रं जरा मोठी असतात. उदा. हिंदी सिनेमा. यात सलमान खानचे सिनेमे पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोचले आहेत, याचा विशेष त्रास होत नाही; कारण त्याच वेळी इरफान खान, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज यांसारखे लोकही लक्षवेधी काम करत आहेत. याउलट मराठी कवितेच्या सुकत गेलेल्या नदीचा हाच एकमेव प्रवाह शाबूत राहिल्यावर त्याचं अस्तित्व नको तितकं जाणवतं.

कुणीतरी कवींना Failed Prophets असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रेषित होण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे. खर्‍यांमध्ये आपल्याला 'माझे दोन्ही बाहू आकाशात फेकून मी सांगतो आहे, पण कुणीही ऐकायला तयार नाही' असं प्रेषितपण दिसतं का? तर माझ्यापुरतं याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. खर्‍यांमधला विद्रोह 'मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही' इथवर येऊन संपतो. धर्मातल्या तत्त्वांना विरोध, किंवा त्याबद्दलचे प्रश्न किंवा त्याबद्दलची मीमांसा वगैरे गोष्टींचा स्पर्श जाणवत नाही. खरं सांगायचं, तर साहित्यशास्त्रातले सिद्धांत, ठोकताळे हे जसेच्या तसे कुठल्याच कृतीला कधीच लागू होत नाहीत. अमुक एक गोष्ट अमुक काळामध्ये अस्तित्वात होती, अशी विधानंच काय ती ढोबळमानानं करता येतात.

आधुनिकतावाद - मॉडर्निझम - ही विसाव्या शतकात आलेली आणि जवळजवळ शतकभर उत्क्रांत होत गेलेली जागतिक साहित्यातली घटना आहे. ढोबळमानाने असं म्हणता येईल, की आधुनिकतेमध्ये 'तार्किक सुसंगती'ला जवळजवळ सोडचिठ्ठी दिलेली आहे. कविता ही कशाचंतरी तात्पर्य असू नये. आर्चबाल्ड मॅक्लाईश (Archibald MacLeish) म्हणून गेला, 'A poem should not mean but be'. त्याच्या या गंमतीशीर म्हणण्याचा अर्थ हा असा आहे. आणि दुसरं म्हणजे साहित्याने सांगू नये, दाखवावं. म्हणजे असं की 'मला दु:ख झालं किंवा मला भीती वाटते' यापेक्षा 'माझे हात थरथर कापू लागले' असं. विल्यम कार्लोस विल्यम्स (William Carlos Williams) या अमेरिकन कवीचं 'No Ideas But in Things.' हे वचन हे मॉडर्निझमच्या एकंदर खजिन्याची एक किल्ली गणली जातं. त्याचा अर्थ ढोबळमानाने हा असा आहे : जीवनाच्या व्यामिश्र अनुभवाचा संपूर्ण अर्थ लेखकालाही कळला असेलच हे कशावरून? तेव्हा कवीने किंवा लेखकाने जीवनानुभव सादर करावा व त्यावर भाष्य करण्याचं टाळावं हे खरं.

तर मग संदीप खर्‍यांच्या कामाला हे सिद्धांत लागू होतात का? पुन्हा एकदा, हे नमूद करतो की वरील आधुनिकतावादी तत्त्वांचा (निकष?) काटेकोरपणे कुणालाही लावावा, असं माझं म्हणणं नाही. तेव्हा, खर्‍यांना एकट्यांनाच दोष न देता असं म्हणता येईल की लोकप्रिय कवितेचा सर्व प्रवास हा यापैकी कुठल्याही गोष्टीशी?,कसलाही संबंध न ठेवता चालू आहे.

कोलटकरांसारख्या कवीला 'बिनाटेलिफोनचा कवी' असं गमतीने म्हटलं जायचं. कारण म्हणे त्यांच्या जवळजवळ पूर्ण आयुष्यात त्यांच्याकडे टेलिफोन नावाचा प्रकार नव्हता. जनसंपर्काचा विषय निघाल्यावर जी. ए. कुलकर्णींची आठवण येणं अपरिहार्य आहे. संदीप खरे आणि त्यांच्यासारख्या परफॉर्मन्सवरच उपजीविका करणार्‍यांच्या या संदर्भातल्या प्रकाराकडे, याही एका दृष्टीकोनातून पाहता येईल.