Wednesday, August 8, 2007

माझा जाहीरनामा (याने के जे आयुष्याचा खूप विचार करतात त्यांच्याकरता मला काही समजलेल्या गोष्टी )

फारच थोड्या गोष्टी स्थिर, अचल , असतात. त्या तशा मिळाल्या तर जतन करायला हव्यात. पण नाही मिळाल्या तरी आपण फारसे गरीब नाही होत. साक्षात् जी ए अपुरे तरी वाटू शकतात किंवा आपल्या स्वतःच्या जळत्या प्रश्नांची उत्तरे जवळ नसल्यासारखे. हृदयनाथमधे तोचतोपणा वाटायला लागतो. अचानक वपुकाळे वगैरेंबद्दल आणि ते वाचणाऱ्यांबद्दल दाखवलेल्या क्रौर्याचा पश्चात्ताप होऊ शकतो. आयुष्याची किंमत म्हणा, त्याचा अर्थ म्हणा, या गोष्टी तुमच्या तुम्ही ठरवायच्या. इतरांच्या मूल्यमापनाकरता जगायला लागणे , सतत त्यांच्या मोजपट्टीकरता उंच उंच उड्या मारणे यात खूपच वेळ वाया जातो. हाती लागते ते अप्राप्य मृगजळ. हपापलेपणात जसा अर्थ नाही तसा न झेपलेल्या निरिच्छतेमध्येसुद्धा. ज्ञानाचे, वैराग्याचे, चांगुलपणाचे बुरखे प्रसंगी उघडउघडच्या स्वार्थीपणा, कोतेपणा आणि बावळटपणापेक्षा वाईट. इन जनरल , बुरखे वाईट. आनंदाची निधाने शोधायला हवीत. मिळाली तर थोडे स्वार्थी होऊन उपभोगायला हवीत. उपभोगताना अपराधीपणाची लक्तरे टाकायला हवीत. उच्चभ्रूत्त्वाचा मलिन लगदा निपटायला हवा. शरीराला घालून पाडून वागवणें चूक. अस्थिर मनाच्या आंधळी-कोशींबीरीत साथ देते ते शरीर. शरीर सलामत तो आत्मे पचास, विचार हजार, तत्त्वज्ञान लाख.रोज नवा शोध लावायला हवा. रोज नवा हेतु शोधायला हवा. नवा अर्थ शोधायचा ध्यास हवा. प्रत्येक नव्या सकाळी आपण कोरे असतो. मनापासून हसण्या-रडण्याची काहीतरी कारणे शोधायला हवीत. स्वत:चे हरवलेले माणूसपण पुन्हा शोधायला पाहिजे.