Wednesday, August 30, 2017

"सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे"

साल २०००. नुकताच अमेरिकेमधे आलेलो होतो. बॉस्टनमधे असतानाची दिवाळी. रांगोळ्या, फराळ, आणि मित्रमंडळ या सर्वांमधे दिवाळी साजरी करताना दिवाळी अंक नसल्याची चुटपुट होती. दिवाळीला तब्बल महिनाभर उलटून गेल्यानंतर केव्हातरी दिवाळी अंक मिळालेले. त्यावेळी मोजकेच मागवले होते. त्यात मौजेचा. नेहमीचा. आवडीचा. "मौजे"च्या अन्य चांगल्या दर्जाच्या लिखाणामधे, दिवंगत साहित्यिक, ख्यातनाम समीक्षक आणि बडोद्याच्या आर्किटेक्चर स्कूलचे एकेकाळचे डीन माधव आचवल, यांच्याबद्दलचाही एक लेख होता. आचवलांचं निधन खरं तर १९८० च्या दशकाच्या सुरवातीचं. त्यामुळे हा त्यांच्या आठवणींवरचा लेख पुष्कळच उशीरा आलेला होता. आणि लेखाची सुरवातही तशीच होती "... हे मी सगळं आताच कां लिहितो आहे, सांगता येणं तसं कठीणच आहे." लेखकाचं नाव होतं दिलीप वि. चित्रे. यातलं मधलं "वि." हे आद्याक्षर ठळक टायपात नव्हतं पण मला मात्र ते ठळकच असल्याचं जाणवलं. दिलीप पुरुषोत्तम चित्रे ऊर्फ दिपु चित्रे म्हणजे हे नव्हेत - जरी दोन्ही दिलीप चित्रे बडोद्याचे असले तरी- हे मला त्या "वि."ने सांगितलं होतं - अगदी पहिल्याच क्षणी.

लेखाचा लेखक अमेरिकेतला होता हे लेखातल्या अनेक उल्लेखांवरून सरळसरळ दिसत होतं. लेखामधे न्यू कॅरल्टन, लॅन्हम वगैरे गावांचा उल्लेख होता. पण ही गावं कुठल्या राज्यात आहेत याचा उल्लेख नव्हता. माधव आचवलांबद्दल सुनीता देशपांडे यांनी लिहिलेला लेख नुकताच "सोयरे सकळ" या संग्रहात आलेला होताच. चित्र्यांचा हा लेखही अगदी त्याच तोडीचा, आचवलांची योग्यता पुरेपूर मांडणारा पण सुनीताबाईंच्या लिखाणापेक्षाही अधिक आचवलांचं माणूसपण, त्यातले ताणेबाणे चितारणारा. यात दिलीप चित्रे आचवलांचे आर्किटेक्चरचे विद्यार्थी होते असा उल्लेख होता. आचवलांच्या, मला अतिशय आवडलेल्या "जास्वंद" पुस्तकातले बहुसंख्य लेख चित्र्यांना त्यांनी "डिक्टेट" केल्याचा उल्लेख आला आणि एकाच वेळी मनात आदर नि मत्सर दाटून आला. लेख मी मुरवून पुरवून वाचला. त्या वर्षांमधे दिवाळी अंकामधे लेखकांचे इमेल आयडी छापले जात नसत. (आता सर्रास तसं छापतात.) त्यामुळे लेखक कोण कुठला असेल याचा अंदाज मी मिनिट दोन मिनिट बांधला असेल. तितकंच.

वर्षं सरलं आणि आमचा मुक्काम बॉस्टनहून वॉशिंग्टन डीसीच्या एका उपनगरात हलला. मुलं अजून जन्माला यायची होती. गावातल्या मराठी लोकांशी हळुहळू ओळख होत होती. गावात यशवंत देव यांच्या गाण्याचा कार्यक्रम लागला तो ऐकायला गेलो होतो. कार्यक्रमाचं आयोजन आणि एकंदर सूत्रसंचालन दिलीप चित्रे नावाच्या कुणी केलं होतं. करड्या रंगाच्या छटा असलेली, शिवाजी महाराज टाईप दाढी. साठीच्या आत बाहेरचे असावेत. ( आचवलांचे विद्यार्थी म्हणजे तेव्हढे वयाने असणार असा अंदाज मला न भेटताही आलेलाच होता.) त्यावेळी आम्ही तसे नवखे. अजून विशेष ओळखी नसलेल्या गावात, काहीशा गर्दीत तो कार्यक्रम ऐकला.

कार्यक्रम संपल्यावर खुर्च्या आवरताना चित्र्यांना मी विचारलं :
"तुम्ही चित्रे ना?"
"हो. मी दिलीप चित्रे."
ते तसे घाईत होते. मला त्यांना कटवायचं होतं असं नव्हे पण हात आवराआवरीमधे गुंतलेले. मीही एकीकडे खुर्च्याच दुमडत होतो म्हणा.
"आता तशी घाईच आहे पण एक विचारायचं होतं. जमेल तेव्हा विचारेन." - मी.
"विचारा ना."
"तो गेल्या वर्षी मौजेच्या दिवाळी अंकात आलेला आचवलांवरचा लेख लिहिलेले तुम्हीच ना?"
खुर्च्या दुमडणारे, एकंदरीत धावपळ करणारे चित्रे थांबले.
"हो. तो मीच. "
"हा तुमचा लेख मला फार आवडला."
"अच्छा. बरं". जरा थांबून थोडे संशयाने बोलल्यासारखे ते म्हणाले , "हो पण आचवलांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?"

मी मनातल्या मनात हसलो. बरोबर आहे. 'याची तीशीसुद्धा आलेली दिसत नाही नि माधव आचवलांबद्दल विचारणारा नि वरतून आपलं मत देणारा उपटसुंभ कोण असावा बरे?' हा त्यांच्या मनातला "ड्वायलॉक् मी वाचला. मी माझं नाव सांगितलं. या भागात तसा नवाच आहे हे सांगितलं आणि थोडंफार वाचन असल्याचं सांगितलं. आणि हो, आचवलांच्या एक दोन पुस्तकांचा उल्लेख केला. त्यांनी आपलं काम थांबवलं. "अगं शोभा, जरा ये इकडे. बघ हा पोरगा काय म्हणतोय." अशी हाक मारली. सुरेख दिसणार्‍या आणि प्रसन्न हसणार्‍या, केसांची कडा अगदी किंचितच करडी झालेल्या एक बाई आल्या. त्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह. "ओह तुम्ही शोभा चित्रे का?" असे शब्द माझ्या तोंडून अवचित बाहेर पडले. त्यांचं थोडं लिखाण वाचल्याची खूणगाठ पटली. आम्ही थोडे हसलो. वेळ फारसा नव्हताच. एकमेकांचे नंबर्स घेतले आणि निरोप घेतला.

पुढच्या काही दिवसांतच आमचा एकमेकांशी फोनवरचा संवाद सुरू झाला तो अगदी परवापरवापर्यंत चालू होता. तीसेक वर्षं अमेरिकेत काढलेले चित्रे माझ्यासारख्या अगदी नवख्याशी मनापासून दीर्घकाळ फोनवर बोलायला लागल्याचं नवल वाटणं साहाजिक होतं.


सुमारे पंधरासोळा वर्षं हा "फोनकॉल" चालू असल्याचा भास मला होतो.


उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट, यशस्वी व्यावसायिक, आदर्श कुटुंबप्रमुख, हे सर्व तर ते होतेच पण अर्थातच आमच्या वयाचं अंतर नाहीसं करणारा दुवा होता त्यांचं साहित्यावरचं, कवितांवरचं, माणसांवरचं, आयुष्यावरचं, आयुष्याच्या प्रत्येक पैलूवरचं उत्कट प्रेम. यात त्यांनी लिहिलेल्या कविता, त्या कवितांचे बनलेले कवितासंग्रह , त्या कवितांना लावल्या गेलेल्या चाली, त्या गाण्यांवर आधारित अमेरिकेच्या गावोगावी कार्यक्रम आले. त्यामधे सत्तर-ऐंशीच्या दशकात "वॉशिंग्टनचे वार्तापत्र" या सदराखाली, एका मराठी नियतकालिकाकरता वर्षानुवर्षं लिहिलेलं सदर आलं, "एकता" सारख्या उपक्रमांमधे लिखाणापासून अन्य बाबींकरता केलेलं काम आलं. महाराष्ट्रातल्या पहिल्या दर्ज्याच्या प्रकाशनांमधे वेळोवेळी लिहिलेले लेख आले. "एनाराय लोकांची आयडेंटिटी" या गोष्टीवर पुस्तकं यायच्या आधी "कुंपणापलिकडचं शेत" या अर्थपूर्ण नावाने संपादित केलेला, एनराय मराठी माणसांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह आला, पहिल्या जागतिक मराठी परिषदेमधे दिमाखाने सादर केलेलं "अलिबाबाची हीच गुहा" हे दिलीप चित्रेलिखित, डझनावारी अमेरिकास्थित मराठी स्त्री-पुरुष-मुलांसकट बसवलेलं नाटक आलं, मूळ संचात बसवलेलं आणि तेंडुलकरांसह अमेरिकेला आणलेलं "घाशीराम कोतवाल" हे तेंडुलकरांचं नाटक आलं, एकट्याच्या जीवावर, १९८० च्या दशकात अमेरिकेच्या वेगवेगळ्या गावांमधे भरवलेला मराठी चित्रपटांचा महोत्सव आला, महाराष्ट्र फाऊंडेशन या , दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी महाराष्ट्रात पाठवणार्‍या संस्थेच्या विश्वस्तपणाचं, दशकानुदशकं केलेलं काम आलं, त्या संस्थेकरता वीस पंचवीस वर्षं न चुकता दरवर्षी महाराष्ट्रात प्रसिद्ध होणारी उत्तम पुस्तकं निरखून पारखून त्याना पारितोषिक देण्याच्या प्रक्रियेमधे पुढाकार घेणं आलं, महाराष्ट्रातल्या मोठ्यामोठ्या साहित्यिक, कवी, नाटककार, लेखक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते यांना आपल्या घरी वर्षातले जवळजवळ १२ महिने या ना त्या निमित्ताने बोलावून, त्यांचं काम लोकांपुढे आणणं आलं. "फॉर हिअर ऑर टू गो" या , एनारायांवरच्या पुस्तकाच्या संकल्पना-सिद्धीचा प्रपंच करणं आलं, "व्हॉईस ऑफ अमेरिका" या अमेरिकन सरकारी प्रसारणा संस्थेमधे मराठी संस्कृतीला स्थान मिळवून देणं आलं, वॉशिंग्टन शहरच्या सांस्कृतिक उपक्रमांमधे हिरीरीने भाग घेणं आलं, चांगलचुंगलं खिलवून (आणि हो पिलवूनसुद्धा!) मैफलींना गाजवणं आलं.

हे सर्व एकाच माणसानं एकाच जन्मात केलं असेल कां? कसं काय केलं असेल? मग असं करता करता त्यांच्या घरात जी सुमारे ३-४हजार मराठी पुस्तकं होती ती त्यांनी कधी वाचली असतील? आपल्या कुटुंबाकरताची कर्तव्यं कधी बजावली असतील? गुणी पत्नीच्या अनेकोत्तम साहित्यिक प्रकल्पांना पूर्ती मिळावी म्हणून तिला समरसून साथ कशी दिली असेल? घराचं बेसमेंट एकहाती फर्निश करण्याचा पराक्रम कधी केला असेल? शेकडो फोटो कधी काढले असतील? कविता कधी लिहिल्या असतील?

पु ल देशपांड्यांपासूनचे अनेकानेक साहित्यिक यांच्याकडे राहून गेले. सुधीर फडके, श्री पु भागवत, विजय तेंडुलकर, वसंत बापट, वसंत डहाके, व पु काळे, अमोल पालेकर, श्रीकांत मोघे .... अनेकानेक सामाजिक कार्यकर्ते .... अनिल अवचट त्यांच्याबद्दल बोलताना एकदा विनोदाने म्हणाले होते, "त्या ज्ञानेश्वरांचा जन्म थोऽडा लवकर झाला म्हणून, नाहीतर तेही चित्र्यांकडे राहून गेले असते."

ही यादी न संपणारी आहे, आणि ती अपुरी आहे. बरं त्या यादीधल्या उरलेल्या बाबी जरी कशाबशा मी पूर्ण केल्या तरी चित्र्यांचं अस्सल माणूसपण त्यामधे सामावणार नाहीच. चित्रे वॉशिंग्टननजिक ज्या भागात राहायचे त्या रस्त्याचं नाव होतं "मर्ना लेन". "जीना यहां, मर्ना यहां, इसके सिवा जाना कहां, जी चाहे जब हमको आवाज दो हम हैं वहीं हम थे जहां" या ओळींवरून आम्ही त्यांची गंमत उडवायचो पण त्या ओळी शेकडो लोकांना खर्‍या वाटल्या असतील, त्यांच्या अर्थाचा स्पर्श चित्र्यांच्या संदर्भात झालेला असेल. मीही त्यातला.
अशा रंगीबेरंगी छटा असणारा माणूस अजातशत्रू असणं अशक्य. त्यांचा फटकळ स्वभाव, त्यांचा स्वाभिमान - काही त्रयस्थ कदाचित त्याला गर्व म्हणतील - तसा त्यांच्या अंगी होता हे त्यांचे अगदी जवळचे मित्रही सांगतील. पण मैत्री इतकाच या अशा प्रकारच्या विवादांमधे जो honor असतो तो त्यांच्याकडे अगदी नक्की होता. त्यांच्याबद्दलचं हे माझं लिखाण म्हणजे आंधळी भक्ती नाही इतपत म्हणतो. त्यांच्यातल्या दोषांसकट मी त्यांच्याकडे पाहिलं. दोष असतील तर ते अगदी थोडे होते. आज इतक्या वर्षांनंतर या अशा गोष्टी त्यांच्या अफाट कर्तृत्वामधे, दाखवलेल्या प्रचंड नि नि:स्वार्थी प्रेमामधे , त्यांच्या खर्‍याखर्‍या जगण्यामधे पूर्णतया विरघळून गेलेल्या आहेत. उरल्यात प्रेमाच्या, त्यांच्या कामाच्या, काव्याच्या, रसिकतेच्या आठवणी.


कुठलेही मृत्यूलेख अपुरे असतात. त्यातही, लिखाणाचं कौशल्य असणारे लोक अधिक विस्ताराने, अधिक महत्त्वाच्या गोष्टी टिपत लिहू शकतील. मी काही तसा हातखंडा असलेला लेखक किंवा पत्रकार नव्हे. ती माझी वैयक्तिक मर्यादा. पण या वैयक्तिक मर्यादेपलिकडेही, "वो जो हम में तुम में क़रार था, तुम्हें याद हों के न याद हों" असं बेग़म अख़्तरबाई म्हणायच्या तसं , दोन व्यक्तींमधलं काहीएक वर्म असतं ते अशा लेखांमधून मांडता येणं हे कौशल्याचं नव्हे तर असामान्य प्रतिभेचं काम आहे. या लेखातून ते मी देऊ शकणार नाही हे मला ठाऊक आहे. अशा अलिखित कराराच्या, एकमेकांबद्दलच्या शब्दांच्या पलिकडल्या भावनांना शब्दांत बांधणं म्हणजे मृगजळाचं बांधकाम आहे. आणि तो प्रदेश माझ्यापलिकडचा आहे.

चित्र्यांचं माझ्या आयुष्यात आगमन अवचित झालं. तसं त्यांचं निघून जाणं सुद्धा. कसलीही कल्पना नसताना त्यांच्या मृत्यूची बातमी आली. अशी बातमी जगण्यामरण्याचे , माणसांमधल्या नातेसंबंधांचे सगळे संदर्भच उलटेपालटे करणारी. आजही ते गेले यावर विश्वास बसत नाही. अधिक काही बोलता येणं कठीण आहे. चित्र्यांच्या आयुष्याबद्दल आता विचार करतो तेव्हा आरती प्रभुंच्या या ओळी आठवतात.

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाया आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगर्‍याचा पानीं मिटून आहे
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे
वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी नि:श्वास टाकताहे
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे
बोले अखेरचे तो: "आलो इथे रिकामा
सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे”