Wednesday, May 15, 2013

"गावाकडची अमेरिका"

डॉ. संजीव चौबळ यांचं "गावाकडची अमेरिका" हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि दोनशे-सव्वादोनशे पानी असलेलं हे पुस्तक पटकन् वाचून झालंसुद्धा. अमेरिकेतल्या मराठी जीवनाची चित्रणे करणार्‍या कथा/कादंबर्‍या/प्रवासवर्णने (आता यात दैनिक सकाळ मधल्या मुक्तपीठ सदरातलं लिखाणही आलंच!) , "फॉर हिअर ऑर टू गो?" सारखी इमिग्रंट-स्टडी ची पुस्तकं आता मराठीमधे रुळली आहेत. या सर्व पुस्तकांचा कमी अधिक फरकाने दृष्टिक्षेप हा, अमेरिकेत येऊन राहिलेल्या मराठी लोकांवर आहे. त्यांमधली अमेरिकेची वर्णने येतात ती इमिग्रंटस् च्या संदर्भातली असतात. अमेरिकेत साठी-सत्तरीमधे आलेले डॉक्टर-आर्किटेक्ट्स असोत की नव्वदीनंतर आलेले आयटी कर्मचारी असोत, त्या सार्‍यांचं वास्तव्य बहुतांशी शहरांमधलं. शहरी वस्त्यांमधे काम करतानाचे सहकर्मचारी , उपनगरी वास्तव्यादरम्यान मुलांच्या मित्रमैत्रिणींचे पालक , डॉक्टरादि व्यावसायिक इत्यादि घटकांमार्फत दिसलेली अमेरिका आता वाचकांना काहीशी परिचित झालेली आहे.

प्रस्तुत पुस्तक लिहिलं आहे अमेरिकास्थित मराठी माणसानेच. मात्र डॉ. चौबळ आणि त्यांचं कुटुंब दाटीवाटीच्या मराठी वस्तीमधे क्वचितच राहिलं. त्यांचं वास्तव्य बहुतांशी राहिलं आयोवातल्या एका अतिशय छोट्या लोकवस्तीच्या ठिकाणी. आयटीच्या नोकर्‍यांची लाट आली त्या काळात अमेरिकेत ते आले खरे, परंतु पशुवैद्यकीच्या डॉक्टरकीची पदवी घेऊन. गावात जेमतेम दोन भारतीय कुटुंबे आणि जे दुसरं कुटुंब होतं ते काही कालावधीत गाव सोडून गेलेलं.

चौबळांच्याच शब्दांत सांगायचं तर "न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, शिकागो म्हणजेच काही अमेरिका नाही. या मोठ्या, अतिप्रगत शहरांच्या अल्याड-पल्याडदेखील दुसरी एक अमेरिका विखुरलेली आहे. साधंसुधं जीवन जगणारी, शेतात राबणारी, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, देवभोळी – प्रसंगी कर्मठ धार्मिक – अशी ही ग्रामीण अमेरिका. "

मला स्वतःला चौबळांचं हे छोटेखानी पुस्तक विशेषतः अन्य इमिग्रंट राईटींगच्या संदर्भात अधिक आवडलं याचं प्रमुख कारण म्हणजे चौबळांची चौकस दृष्टी, एकंदर ग्रामीण व्यवस्थेचं वर्णन करताना दिलेली आकडेवारी , त्या आकडेवारीमधून निर्देशित केलेले वास्तवाचे निरनिराळे पैलू, त्या आकडेवारीपलिकडच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा. या खंडप्राय देशातल्या प्रचंड मोठ्या प्रदेशातल्या ग्रामीण भागात फक्त १८ टक्के जनता कशी राहाते, तिथलं जीवनमान कसं आहे, कुठली राज्ये शेतीप्रधान आहेत, शेती करण्याच्या प्रक्रियेमधे क्रमाक्रमाने बदल कसे होत गेले, तंत्रज्ञानाने नक्की कसा फरक पडला, आधुनिक अमेरिकन शेती आणि पशुपालनाचं स्वरूप , त्यातल्या खाचाखोचा , समस्या आणि त्यावरच्या वर्तमानकालीन आणि भविष्यातल्या उपाययोजना असा एकंदर सांगोपांग आढावा यात आहे.

मात्र हे पुस्तक निव्वळ आकडेवारीत अडकलेलं नाही. चौबळांची कंट्री म्युझिकची - अगदी शून्यापासून - विकसित झालेली आवड, त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहिलेल्या प्राणिसृष्टी आणि ग्रामीण जीवनाचे कॅमेर्‍यावाटे टिपलेले क्षण , आणि हो - खुद्द चौबळांनीच काढलेली प्राण्यांची रेखाचित्रेही. यात मधे मग थँक्सगिव्हिंग सेल मधे झालेल्या धावपळीची - आणि फजितीची गमतीदार गोष्ट येते, "रूट ६" या आवडत्या रस्त्याशी जडलेल्या नात्यावरचं एक प्रकरण येतं. चौबळांनी अमेरिका पाहिली ती निव्वळ डोळ्यांनीच नव्हे. इथल्या लोकांचे रीतीरिवाज, त्यांची धार्मिकता यांकडे त्यांनी डोळसपणे पाहिले आहे. या देशात रहात असताना, हा देश कसा बदलत गेला त्याचं ऐतिहासिक भान चौबळांच्या लिखाणातून प्रतीत होतं.

एवढं सगळं करून, आपल्याला अमेरिका समजली असा लेखकाने कुठेही दावा केला नाही. नैसर्गिक वैविध्याने संपन्न असलेला हा खंडप्राय देश इतका प्रचंड आहे की निव्वळ ग्रामीण जीवन लक्षांत घेतलं तरी चौबळांचं लिखाण सर्वसमावेशक नाही आणि ते त्यांनी अगदी सहजपणे मान्य केलेलं आहे.

या पुस्तकाचा सहजपणा, वेगळेपणा आणि कुठलाही आव न आणता , मात्र अचूक निरीक्षण आणि योग्य ते विश्लेषण यांची जोड देऊन केलेले परिणामकारक वर्णन म्हणून हे छोटेखानी पुस्तक मला विशेष आवडले.

पुस्तकाचे शीर्षक : "गावाकडची अमेरिका"
लेखक : डॉ. संजीव चौबळ
प्रकाशक : मराठीसृष्टी, ठाणे
किंमत : रुपये ३५०

अमेरिकेत हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करून मिळण्याकरताचे दुवे :

http://www.bookganga.com/eBooks/Book/4644779470285255546.htm
http://kharedi.maayboli.com/shop/home.php