Monday, June 1, 2009

"दसविदानिया"

डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये.

तर , चित्रपटाच्या ह्या गमतीशीर नावामागे आहे "दो स्विदानिया" या , रशियन वाक्प्रचारावरील श्लेष. "दो स्विदानिया" म्हणजे भेटीअंती निरोप घ्यायचे शब्द :" गुड् बाय्" या अर्थी. "कॅन्सरने अकाली मरू घातलेल्या एका पस्तीशीच्या अविवाहित माणसाने , आपल्या शेवटच्या दिवसांत बनवलेली कामांची यादी आणि त्या कामांची पूर्तता" अशा एका ढोबळ कथासूत्रात चित्रपटाचे सार सामावते.

अर्थातच , विनय पाठक या नटाने केलेली "अमर कौल" ही या सिनेमातली मध्यवर्ती भूमिका. या नटाबद्दल , त्याने केलेल्या आधीच्या कामांमुळे विलक्षण कुतूहल आणि आदर वाटत् होताच. माझ्यापुरते म्हणायचे तर या चित्रपटाकरता , त्याने आपले सर्व कौशल्य म्हणा , अभिनयाची जाण म्हणा , एकूण जगण्याबद्दलचे भान म्हणा या सर्वांतील उत्कृष्ट म्हणता येईल ते पणास लावले , या भूमिकेचे सोने केले असे मी म्हणेन.

मृत्यूविषयक चिंतन , "मरणात खरोखर जग जगते" , "मृत्यूस कोणी हासे , मृत्यूत कोणी हासे" वगैरे वगैरे वचने या सर्व गोष्टी खरे तर नवीन नाहीत. खुद्द हिंदी चित्रपटांत सुद्धा , मृत्यूविषयक चित्रपट कमी नाहीत. दिलीप कुमार पासून शारुख खान पर्यंत , ऐन तारुण्यात मरणारे नायक आपण पाहिलेत. "आनंद" सारख्या चित्रपटावर कुसुमाग्रजांसारख्या मातबर कवीला एक चिंतनगर्भ नाटक लिहावेसे वाटले. "दसविदानिया" या परंपरेतला असेही एका अर्थाने म्हणता येईल.

मात्र , यातला नायक , कुठल्याही उत्तुंग शोकांकितेत शोभावा असा नाही. त्याच्याकडे ट्रॅजेडी किंगचा रुबाब नाही , सत्तरीमधल्या सुपरस्टारचा करिष्मा नाही , शारुख खान सारखा शेकडो कोटींचा वायदा हा चित्रपट स्वप्नात करत नाही. नायकाचे दिसणे , त्याचे कर्तृत्व , मृत्युची सावली पडायच्या आधीचा त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन , इतरांना त्याच्याविषयी - इतरांनाच काय , त्याला स्वतःलासुद्धा - त्याच्याविषयी फार आदर , प्रेम , दरारा असे काहीच वाटत नाही. मात्र , मर्ढेकरांच्या कवितेतली "तू एक मुंगी , मी एक मुंगी" मृत्यूच्या छायेत वावरताना , अचानक संपत आलेल्या जीवनरसाच्या शेवटच्या थेंबाना पीताना , मुक्ताबाईच्या "मुंगी उडाली आकाशी" शी , क्षणैक का होईना , पण नाते सांगून जाते.

स्वतःला जपून असलेला हा माणूस शेवटच्या दिवसांमधे गिटार शिकतो , मोटार घेतो , नोकरीला लाथ मारतो (आणि नोकरीला लाथ मारताना संवेदनाहीन बॉसलाही) हेसगळे तर ठीकच. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे , अशा अनेक गोष्टी करतो , ज्या एरवी स्वभावजन्य भीड , "इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स्"मुळे त्याने केल्या नसत्या. उदाहरणार्थ , जिच्यावर बालपणापासून प्रेम केले, त्या , आता एका मुलीची आई झालेल्या आपल्या मैत्रीणीला तो सांगतो की , "तुझे आताचे आयुष्य दृष्ट लागण्यासारखे सुंदर आहे खरे ; पण मी मात्र तुझ्यावर प्रेम केले - अगदी लहानपणापासून." आणि एखादी लढाई जिंकल्याच्या आनंदात पावसात निघून जातो. आपल्या एकेकाळच्या जीवलग मित्राला १२ वर्षांनी भेटण्याकरता रशियाला त्याच्या आलिशान घरी जातो . त्याच्या बायकोला वाटते , हा फुकट ट्रीटमेंट मागायला आलाय. तर तो कुणावरही न चिडता शांतपणे त्या घराबाहेर पडतो . नंतर आपल्या त्याच मित्राला अगदी शांतपणे सांगतो : "तुला भेटायचे होते , ते भेटलो. याहून काही नको होते. तुझ्या बायकोला भेटण्याइतका आता वेळ नाही , तिलाही माझा नमस्कार सांग"

माझ्या दृष्टीने , जर या चित्रपटाचे काही यश असेल तर , ते हेच की , अरे , लिस्टा बनवायच्या तर "गीझर दुरुस्त करायचाय्" , "ऑफिसात अमुक रिपोर्ट् अमुक तारखेपावेतो द्यायचाच आहे" असल्या गोष्टींचाच नका करू फक्त. हेच करत रहायचे असेल तर मग आणखी ४ महिने जगलो काय आणि ४० वर्षे जगलो काय , काय फरक पडतो ? "या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या ओळी ऐकून ऐकून जर सवयीच्या होत असतील आणि आपण काडेचिराईताचे आयुष्य सोडणार नसू , तर काय उपयोग आहे या ओळींचा ?

हे झाले चित्रपटाच्या अस्तिपक्षी. काही गोष्टी टाळता आल्या असत्या. मुद्दाम रडू आणण्याचा प्रयत्न केलेले ("टीअर जर्कींग्") काही प्रसंग , रशियात , मित्राच्या घराबाहेर पडल्यावर एका वेश्येबरोबर घालवलेला काळ , तिने त्याला निराशेपोटी करत असलेल्या आत्महत्येपासून परावृत्त करणे इ. इ. भाग अतिरंजित वाटू शकतो. मात्र एकूण पटकथेचे हलकेफुलके , सहज स्वरूप , पाठकसकट सगळ्यांनी केलेला अभिनय , मृत्युविषयक भाष्याला कठोपनिषद-सदृष् अतिगंभीर , किंवा सामुदायिक हंबरडेवजा स्वरूप देण्याचे टाळून , त्यातल्या विसंगतींना नर्म विनोदाच्या शिडकाव्याने रंगविणे यामुळे , एकूण सकारात्मक बाबींचे पारडे माझ्या हिशेबाने जड ठरले.