कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे.
जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल.
पुढील परिच्छेदांमधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये.
जीएंच्या , प्रसंगी लघुकादंबर्यांइतक्या मोठ्या आकाराच्या आणि खोलीच्या कथांच्या मानाने ही कथा खूपच छोटी आहे. आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा. आयुष्यभर आपल्या लिखाणातून जी एंनी आपल्या आयुष्याबद्दल, त्याच्या अर्थाबद्दल , माणूस म्हणून जगताना भोगाव्या लागलेल्या दु:ख-वेदनांबद्दल लिहीले. लेखक म्हणून सुरवातीच्या काही वर्षांनंतर त्यांच्या कथांचे स्वरूप गुंतागुंतीचे होत गेले, त्यातील दु:खाच्या छटा जास्त जास्त गडद होत गेल्या. आणि , नियती म्हणा , भागधेय म्हणा, त्याच्या वरवंट्याखाली पिचतानाही आपला अभिमान , आपले सत्त्व न हरवणारी माणसे त्यांनी रंगवली. प्रस्तुत कथेतील कथानक हे , त्यांच्या पुढील प्रवासाच्या पाऊलखुणा दाखविणारेच आहे.
कथेचा निवेदक आहे एक साताठ वर्षांचा , गावातल्या एका गरीब (बहुदा ब्राह्मणी) कुटुंबात वाढणारा एका मुलगा. काळ : बहुदा आजपासून सत्तरेक वर्षांपूर्वीचा. कुटुंबात माणसे तीनच. आई-वडील आणि हा छोटा मधू. कथा सुरु होते तेव्हा चैत्र महिना चालू आहे आणि घराघरांमधून हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू आहेत. रोज कुठे ना कुठे कार्यक्रम असतो. या छोट्याशा गावातलीच एक बाई घराघरांमधे जाऊन "आजचे हळदीकुंकू कुलकर्ण्यांकडे , आजचे हळदीकुंकू नाईकांच्या वाड्यावर" अशी दवंडी पिटत जाते. रोज संध्याकाळी सवाष्णी एकमेकांच्या घरी आपापल्या पोरांना घेऊन जातात.
छोटा मधूही नाईकांच्या वाड्यावर आईबरोबर जातो. हा भला थोरला वाडा. मोठी मोठी जाजमे, हंड्या-झुंबरे , अत्तरांचा आणि वेण्यांचा घमघमाट. इतर बायकांबरोबर मधुची आई ओटी भरवून घ्यायला बसते. थोरामोठ्यांकडचा मोठा समारंभ. गर्दी. या गर्दीत इतर पोरांबरोबर खेळतानाही मधूचे लक्ष आईकडे आहे. नाईकबाई एका नोकराणीबरोबर फिरत सगळ्यांची ओटी भरतात. मधूच्या आईची ओटी भरायची वेळ आल्यावर त्यांना वगळून पुढे जातात. मधूची आई वाटा पाहाते आणि शेवटी मालकीण बाईंकडे जाते नि त्याना आठवण करून देते. मालकीण बाईंचा समज झालेला असतो की यांची ओटी भरलेली असतानाही , थोडे आणखी धान्य मिळण्याकरता ही बाई परत पदर पसरून बसली. ती मधूच्या आईचा अपमान करते. एक अवाक्षर न बोलता आई इतकेच म्हणते , की ओटी म्हणजे सवाष्णीचा मान आहे. तो राखण्याकरता तरी ओटी भरा - वाटले तर एक दाणा टाका. न राहवून नाईकबाईची सासूही तसे करायला आपल्या सुनेला विनविते. पण शेवटी मधू आणि आई रिक्तहस्ते घरी परततात.
घरी आल्यावर रात्री एकही शब्द न बोलता आई मधू आणि त्याच्या वडिलांना जेवायला घालते. दुसर्या दिवशी ती आपले काही दागिने काढून मधुच्या वडिलांना देते आणि त्याचे पैसे करून एका मोठ्या हळदी कुंकवाची तयारी करायला सांगते. वडील काहीही न विचारता हो म्हणतात. आई त्यांना विचारतेही : "तुम्हाला का असा प्रश्न नाही पडला ?" वडील शांतपणे म्हणतात : "स्वतःकरता कधीही काहीही न मागणारी तू काहीतरी करायला सांगते आहेस. त्यामागे नक्की काहीतरी आहे. मी कशाला विचारू ? उद्या तू म्हणालीस की निखार्यावरून चालत जा तर तेही करेन." हे सारे मधू पहातो , नोंदवतो.
दुसर्या दिवशी मधूकडे आजवर झाले नसेल इतके मोठे हळदीकुंकू. गावभर दवंडी गेलेली असते - नाईकांकडेही. समारंभ खूप वेळ चालतो. एरवी घराचे मालक असणारे मधूचे बाबा त्या संध्याकाळपुरते घराबाहेर. मधूची आई सगळ्यांची रितीने ओटी भरते , विचारपूस करते. सगळ्या बायकांच्या नजरेत तिच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. आईची एक नजर अर्थातच दाराकडे. सगळ्या येऊन गेल्या ; पण नाईक बाई नाहीत. शेवटी खूप उशीरा सासू नि सून आपल्या बग्गीतून हजर होतात. मधूच्या छोट्याशा घरातल्या सजावटीने , आदबशीर , घरंदाज आतिथ्याने भारल्यासारख्या होऊन जातात. भरपूर मोठी ओटी भरून घेताना नाईक सूनबाई इतकेच म्हणते "तुमच्याकडे होते होय हळदीकुंकू ? मला कल्पना नव्हती." दोघी निघतातच.
बग्गीत सून बसलेली असताना सासू क्षणभर आईपाशी येते नि म्हणते : बाई, मनात तळपट धरू नकोस. आता माझं राज्य नाही घरात. नवीन माणसं आली. मी झाल्या प्रकाराने लाजलेले आहे. जमेल तेव्हा याची भरपाई करेन.यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " दूर अंधारात मधू हे सर्व पहातो. बग्गी हलते.
वर्ष उलटते. पुन्हा चैत्र येतो. मधूच्या घरासमोर एके दुपारी बग्गीचा आवाज आल्यावर आई पटकन आत जायला वळते. मधूला सांगते : "नाईकबाई येतील. त्यांना सांग मी न्हाणीघरात आहे. जे सांगतील ते फक्त ऐक. जाताना फक्त करंडा दे कुंकवाचा त्यांना. " मिनिटाभरात सासूबाई दारात येतातच. मधू त्यांना ठरल्याप्रमाणे सांगतो. त्या आलेल्या असतात हळदीकुंकवाचे निमंत्रण द्यायला - जातीने , सर्वात पहिल्या घराचा मान द्यायला. निरोप देतात , कुंकू लावून निघून जातात.
मधू आत येतो. आई त्याला म्हणते : "मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. " मधूला काही उमगत नाही. माजघराच्या अंधारात उभ्या आईला म्हणतो : "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" आणि इतका वेळ आपल्या गंभीर , ताठ चेहर्याने वावरणार्या आईला हुंदका येतो.
कथानक भाग संपूर्ण
हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे क्रांती कानडे यांनी. आईची भूमिका केली आहे सोनाली कुलकर्णी यांनी. नाईक सासूचे काम लालन सारंग यांचे.
संपूर्ण चित्रपटाची हाताळणी मूळ कथेशी इमान राखणारी , त्या कथेच्या घरंदाजपणाशी इमान राखणारी झाली आहे. कुठेच भडक, बटबटीतपणा नाही. झालेला अपमान , त्याची केलेली भरपाई , साताठ वर्षाच्या मुलावर नकळत घडलेले संस्कार या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने टिपल्यात. आई वडीलांमधील शालीन , घरंदाज स्नेहाचे चित्रण , कोसळलेल्या संकटाला धीराने सामना देताना इतरांवर आणि स्वतःवर "चिखल उडू न देण्याची " घेतलेली काळजी आणि हे यच्च्यावत टिपणारे एक बालमन. सत्तर वर्षांपूर्वीच्या ब्राम्हणी घरातले वातावरण , पेहराव , हंड्या-झुंबरे. एकही सैल , अनावश्यक संवाद नाही. मी कानडे यांना सलाम करतो. पालेकरांनी त्यांच्याकडून खूप शिकावे अशातली गत. सोनाली कुलकर्णी यांच्याबद्दल मला थोडी शंका होती. बट शी हॅज नेल्ड द रोल.
हा , केवळ ३० मिनिटांचा चित्रपट दृष्ट लागण्यासारखा झाला आहे.
Tuesday, December 9, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
excellent! GA is gr8. you too have written nicely.
सुंदर लिहिले आहे. पण एक समजले नाही. वडील केंव्हा गेलेले असतात? कारण छोट्या गावात अशी गोष्ट किती लपून राहणार?
अतिशय भावपुर्ण लिहिली आहे समिक्षा!! अशाच आशयाची एक कथा शाळेत असताना अभ्यासाला होती!! माझ दुर्दैवच, मला तिचे लेखक आणि शिर्षक, दोघांपैकी काहीच आठवत नाहिये.. कथा आई आणि तिच्या मुलाबद्दलच होती! वाणी मुलाच्या आईने सामानाचे पैसे दिले नसतात म्हणुन भर रस्त्यात त्याचा कान पिळतो, आणि अत्यंत अपमानास्पद बोलतो! त्यावर त्या स्वाभिमानी बाईची प्रतिक्रिया काहिशी जी.एंच्या कथेतल्या आई सारखीच!! आपल्या मुलाला जगातल्या वाईट आणि चांगल्या प्रव्रुत्तींबद्दल माहिती देण्याची त्या दोन्ही माउलींची तळमळ(योग्य शब्द सध्या सुचत नाहिये), अगदी हळुवारपणे दोन्ही कथांमधे मांडली आहे! अजुन काय लिहु.. खर म्हणजे रडु आल कथेच्या शेवटी...
तुमचा चित्रपटावरचा लेख सुद्धा खुप भावला!
well written.. is this movie available on DVD or in the market yet?
शरयू, त्या कथेचे नाव आहे फेड
संपूर्ण कथा येथे वाचता येइल http://mvm.chinmayeeinfotech.com/index.php/2008-09-12-10-19-32/2008-11-06-18-00-19/2008-09-12-10-28-21/23-2008-09-12-10-47-36/133-2008-10-11-04-38-50.html
छान लिहीले आहे. जीएंच्या मी वाचलेल्या इतर कथांपेक्षा वेगळी वाटली एकदम.
Very nicely written Rajan. I have collection of GA's books, but this one is not there...Very good review..
- Rupali
Post a Comment