Tuesday, December 9, 2008

"वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता"

अलिकडे काही नवीन कवींच्या आंतरजालावर वाचत होतो. एका कवितेपाशी आलो नि वाटले , काहीही झाले तरी या माणसाच्या कविता वाचल्याच पाहिजेत. कवीचे नाव : वर्जेश सोलंकी. सुदैवाने यांचा काव्यसंग्रह हाताशी लागला. कवितासंग्रहाच्या बाबतीत असे क्वचितच घडते की पहिली कविता वाचायला सुरवात करावी नि शेवटची कधी आली ते कळूच नये. प्रस्तुत संग्रहच निव्वळ ६०-६५ पानांचा आहे म्हणून असेल; पण एका बैठकीत वाचून झाला सुद्धा.

१९९० च्या दशकात भारताची व्यवस्था कूस पालटत होती. येणार्‍या नव्या युगाबरोबर नवे प्रश्नही आलेच. शासनाच्या, अर्थव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या बदलांची स्पंदने नव्वदीच्या दशकातल्या तरुण कवींच्या रचनांमधे ऐकू यायला लागली. वर्जेश सोलंकी याच पीढीचे कवी. एखाद दोन कवितांचा आस्वाद आपण घेण्याचा प्रयत्न करूया.

शीर्षक : व्हॅक्युमक्लीनर
पसरलो हॉलभर
सुगंधित स्प्रेच्या वासाबरोबर
म्हणून लक्षात नाही आली कुणाला
मोज्यातली दुर्गंधी.

मित्रानं दाखवली
एकेक खोली
कीचन
कोठेच खिडकी नसलेली
आली ऐकू
एक्झॉस्ट् फॅनची संथ घरघर
कण्हल्यासारखी
ताटंबिटं ग्लासंबिसं बशाकप डबेबिबे
नावं लेबलासहित
व्यवस्थितपणे मांडून फडताळावर.

हॉलमधल्या भिंतीच्या रंगाला
मॅचिंग असलेलं सागवानी फर्निचर
बोन्सायची झाडं शोभेच्या वस्तू
गणपतीची कलात्मक फ्रेम
एकंदर सगळं छानच.

आपण त्यात मिसमॅच की काय ?
या विचारानं मी एसीकंटेन्ड रूममधे
घामाघूम.
मित्र म्हणाला:
खिडकीतून पाऊस छानच दिसतो
आणि चंद्र
नुकताच पेंट दिलेल्या बंगल्यासारखा. उजळ.

मी जेवलो
सवय नसताना
काटेचमच्यातून
ताटाभोवती खरकटं पडू न देण्याची खबरदारी घेत.

इतपत सर्व ठीक होतं.
मात्र मित्राच्या बायकोनं कपाटातून व्हॅक्युमक्लीनर काढला
तेव्हा
लटपटलोच
निघालो घाई-घाई करत फ्लॅटबाहेर
वाटलं आता ओढला जाईन की काय ?
फोलपटासारखा
फरशीवरल्या धुळीबरोबर.
----------------------------------------------------------
कविता वाचली आणि त्यातील विनोदाने हसायला आलेच ; पण त्यात टिपलेली विसंगती , आपल्या आयुष्यातील साध्यासुध्या गोष्टींमधे माणसांपेक्षा वस्तूंना आलेले महत्त्व या गोष्टी नजरेआड कशा होतील. मुख्य म्हणजे अगदी नेहमीच्या आयुष्यातल्या संवादांसारखी कविता. ना त्यात कसला अभिनिवेश ना प्रतिमा-उपमांचा सोस.

दुसरी कविता तुमच्यापुढे मांडतो.

शीर्षक : आपण कविता लिहाव्यात का ?

आपण कविता लिहाव्यात का ?
की न लिहाव्या
की लिहाव्याच
आपल्या लिहीण्या न लिहीण्यानं कोठे
फारसा फरक पडणारेय ?
उदा: पेरली जातील काय क्रांतीची बीजं
फ्रस्ट्रेटेड युवा पीढीच्या मनात
क्रीएट होईल काय एखादा पॉझीटीव्ह अप्रोच वगैरे
की आपलं लिहीणं म्हणजे
बापाच्या शब्दात
एकंदर भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं
की
कपाटामागं उंदरानं सोडलेल्या लेंड्या
की
उगाच आतलाबितला आवाज/हुक्की / उत्कटता
की
शब्दांचा उभाआडवा कीस/फापटपसाराकीफलाणा-ढिकाणा.
------------------------------------------------------------------------

No comments: