आयुष्यात काही गोष्टी वेळच्या वेळी होण्याला थोडा अर्थ आहे. खरं तर या विधानात तसं काही महत्त्वाचं असं नाहीच. कुठल्याही गोष्टीची एकच एक वेळ असते आणि ती तेव्हाच व्हावी वगैरे ठोकताळे विनोदीच. पण जरा पोक्तपणा आणायचा प्रयत्न म्हणून असं काहीतरी म्हणायचं, इतकंच काय ते.
पुस्तकांच्या वाचनाच्या बाबत या गोष्टीला थोडा गंमतीशीर अर्थ आहे. बदलत्या वयानुसार बदलत जाणार्या आवडीनिवडी, त्या त्या वयात महत्त्वाच्या-बिनमहत्त्वाच्या वाटणार्या गोष्टींचं वाचन यांमधली गंमत आता त्रयस्थपणे बघता येते.
मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो त्यामुळे "अंतरिक्ष फिरलो, पण..." अजून मराठी पुस्तकांची गोडी टिकून आहे खरी. ("अंतरिक्ष फिरलो, पण" या शब्दांचा शब्दशः अर्थ - अर्थातच - घेऊ नये. ती एका काव्यपंक्ती आहे इतकंच :-) ) मराठी पुस्तकांचं वाचन जे शाळा कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झालं त्यात काही खंड पडला नाही. सुनीताबाई देशपांडेंनी आपल्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत म्हण्टलं होतं की "कवितांना ... ज्यांनी आयुष्यभर साथ केली." आता कवितांबद्दलच्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या आकलनाबद्दल आमच्यासारखे लोक सुनीताबाईंच्या पासंगापाशी पोचणार नाहीत. पण मराठी पुस्तकांच्या बाबत मात्र "त्यांनी आपली आयुष्यभर साथ केली" इतपत म्हणता येईल.
त्यामुळे मराठीपुरता विचार करायचा तर पुस्तकं, लेखक कळत्या वयात भेटले. काहींशी मनातल्या मनात कायमची जवळीक झाली. काही उपरे राहिले. काही जण काही काळानंतर फार जवळचे वाटेना झाले. काही दुर्मिळ बनले. वय वाढलं तसतसे नवे भेटत गेले. एकंदर हा सगळा वाढता वसा. "हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे" का काय म्हणतात ते. अजूनही मराठीतली कितीतरी महत्त्वाची, मोठी, मैलाचा दगड असलेली, वेगवेगळ्या संदर्भातली उत्तम पुस्तकं वाचून व्हायची आहेत पण ती कधीतरी होतील अशी अंधुक आशा आहे. हा रस्ता आपल्या परिचयाचा आहे, आपलाच आहे, त्यावर डोळे झाकूनही चालता येईल अशी काहीतरी भावना आहे.
इंग्रजी भाषेशी नातं कुतुहलाचं, आदराचं, (अभ्यासाच्या पुस्तकांच्या बाबत गरजेचं!), पण एकंदरीत काठावरचं. मायमराठीच्या नदीत मनसोक्त डुंबण्यासारखं म्हणता येणं कठीण. कारण कुठलंही इंग्रजी पुस्तक - मग ते कितीही रंजक, उद्बोधक, रसाळ, मती गुंगवणारं, थरारक, बुद्धीमान असं काहीही असलं तरी ते शेवटी उपरंच म्हणून हाती येतं. अगदी अजूनही. आता अगदीच डिक्शनरी हाती घ्यावी लागत नाही पण "वाट तरी सरळ कुठे, पांदीतील सारी" ही भावना काही समूळ नष्ट होत नाही. दुसरं म्हणजे इंग्रजी भाषेतलं चांगलंचुंगलं - अगदी प्रातिनिधिक स्वरूपाचं, नमुनेवजा तरी - सगळं कधीच वाचून होणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे. गेली चार पाचशे वर्षं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी केलेलं काम आणि मग देशीविदेशी हर प्रकारच्या भाषेच्या लेखकांच्या कामाची इंग्रजीमधे होत गेलेली भाषांतरं हे सर्व जमेस धरलं तर इंग्रजीमधे मामुली फेरफटकाही मारून होणार नाही हे आपल्यापुरतं ठरलेलं आहे. किमान या बाबत काही अवास्तव कल्पना उराशी नाहीत हेही नसे थोडके. हा विषय फार म्हणजे फारच मोठा आणि असल्या टीचभर टिपणात सामावणारा नाही.
हे सर्व सुचायला निमित्त झालं जेन ऑस्टीनच्या अलिकडे केलेल्या "प्राईड अँड प्रेजुडीस" या कादंबरीच्या वाचनाचं. कादंबरी वर्ल्ड क्लासिक्समधे गणलेली. कादंबरी प्रसिद्ध होऊन - इतकंच नाही तर जेन ऑस्टीनचं निधन होऊन - दोनशे वर्षं होऊन गेलेली आहेत. दोनशे वर्षांच्या या मोठ्या काळात ही कादंबरी सुरवातीला इंग्लिश समाजात आणि नंतर क्रमाक्रमाने युरोप, अमेरिका आणि मग जगाच्या अन्य भागांमधे कशी पसरली, सुरवातीला ती लोकप्रिय पण कलात्मकदृष्ट्या फारशी दखलपात्र कशी नव्हती, आणि मग इंग्रजी साहित्याच्या इतिहासातली मैलाचा दगड बनलेली कशी झाली हाही इतिहास मजेशीर आहे. शाळा कॉलेजांमधून ती शिकवली गेली आणि अजूनही ती "लावलेली" असतेच. १९४० च्या दशकापासून त्यावर सिनेमे आणि टीव्हीचं युग सुरू झाल्यावर सिरियल्स बनत आहेत. अगदी बॉलीवूडपर्यंत तिच्यावर सिनेमे बनवले जात आहेत. १९८० च्या दशकात दूरदर्शनवर "तृष्णा" नावाची सिरियल त्यावर येऊन गेलेली होती.
१९९५ साली बीबीसीने काढलेली ८ भागांची सिरियल म्हणजे या कादंबरीवरचं आजतागायत झालेलं सर्वोत्कृष्ट काम असं म्हणायला हरकत नाही. कॉलीन फर्थ याने रंगवलेल्या डार्सीने देशविदेशीच्या लाखो करोडो स्त्रियांचा कलिजा खलास झाला. कॉलिन फर्थ जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सुपरस्टार बनला तो या एका घटनेने. या सिरियलमधल्या एलिझाबेथ रंगवलेल्या नटीचं कामही उत्तम होतं पण चांदी झाली ती "डार्सीची" :-)
"फॅन फिक्शन" आणि "नव्या आकलनांच्या" बाबतसुद्धा ही कादंबरी आघाडीवर आहे. खूनखराबा, (पी डी जेम्स या ख्यातनाम लेखिकेने या कादंबरीतल्या गावामधे एकामागोमाग खून होतात असं कथानक रचलं आहे!) माणसं खाणारे "झाँबीज्" अशा काय वाटेल त्या गोष्टी तिच्यावर रचल्या गेलेल्या आहेत. त्याहून अधिक निर्मितीच्या शक्यता बहुदा शेक्सपीयरच्या नाटकांनीच नोंदवल्या असतील.
तर अशी, कॉलेजच्या दिवसांमधे राहून गेलेली जगप्रसिद्ध कादंबरी. "बेटर लेट दॅन नेव्हर" म्हणून प्रौढत्वी वाचायला घेतली त्याबद्दलचे हे विचारतरंग. इतकंच या टिपणाचं स्वरूप.
दोनशे वर्षं झालेल्या कादंबरीचं कथानक नव्याने देणं ही एक फॉर्मॅलिटी आणि कथानक देत आहे असं डिस्क्लेमर देणं ही आणखी एक. ती करतो.
१७७५च्या आसपासचं इंग्लंडमधल्या जमीनधारी उच्च आर्थिक स्तरातलं वातावरण. जमिनीच्या भाड्यातून येणारं सर्वांचं उत्पन्न. कुणाला कामधंदे करायलाच हवेत असं काही नाही. या वर्गातलं कुणी काम करत असतानाचं चित्रण कादंबरीत बहुदा अभावानेच. अशाच प्रकारच्या कुटुंबांमधल्या बेनेट दंपतीच्या पाच मुली. वयात येत असलेल्या. त्यांच्या लग्नाची काळजी बेनेट्बाईंना आहे. बेनेटबुवा तसे काळजीग्रस्त नाहीत. (इथे 'पडोसन' सिनेमातल्या ओमप्रकाशच्या "बिंदूकी माँ, जब जब जो जो होना है, तब तब सो सो होता है" या वाक्याची आठवण येते :-) ) कादंबरीच्या सुरवातीला आलेलं वाक्यच कमालीचं लोकप्रिय आणि इंग्रजी भाषेतल्या सुप्रसिद्ध वचनांपैकी एक ठरलं : "It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife." जेन ऑस्टीनच्या अप्रतिम शैलीची आपल्याला इथेच चुणूक मिळते. तर या पाच बहिणींपैकी एलिझाबेथ बेनेट ही कादंबरीची नायिका. पाचही बहिणींमधली सर्वात बुद्धीमान, शहाणी, स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व असलेली, स्वतःचा आब राखणारी, स्वाभिमानी, ठसठशीत, स्पष्ट मतं असलेली (आणि पटकन मतं बनवत असल्यामुळे चुकीचे निर्णय कधीकधी घेण्याच्या धोक्यात सापडणारी - पण स्वतःच्याच विवेकामुळे त्या धोक्यांमधून बाहेरही पडणारी.) कादंबरीचा नायक फिट्झविल्यम डार्सी. याच उमराव वर्गातला. गर्विष्ठ तिरसट वाटणारा, नक्कीच घुमेपणा करणारा, अबोल, मात्र कुठल्याही प्रकारच्या खोटेपणा, दिखाऊपणापासून दूर राहाणारा, कुठल्याही प्रकारच्या फसवाफसवीवजा वर्तनापासून दूर राहाणारा. क्वचित हसणारा, तत्कालीन समाजाचा स्थायीभाव असलेल्या नृत्य आदि गोष्टींपासून फटकून वागणारा - आणि म्हणूनच एलिझाबेथला ज्याच्याबद्दल गैरसमज उत्पन्न झालेला आहे असा. या समज-गैरसमजांची कोळिष्टकं दूर होतात आणि अंतिमतः नायक नायिकेचं मीलन होतं. मग या सव्यापसव्यात अर्थातच इतर बहिणी, डार्सीचा मित्र, त्याचं एका बेनेट बहिणीबरोबर जमलेलं सूत, इतर विनोदी किंवा खलत्वाकडे झुकणारी वाटतील अशी पात्रं. असा एकंदर हिशेब.
स्पॉयलर अलर्ट इथे संपला असं समजायला हरकत नाही.
कादंबरीच्या कथानकावरून, "या अशा कथा आपण यत्ता दहावीच्या आसपास वाचत होतो" हा विचार मनात आल्यावाचून राहात नाही. जेन ऑस्टीनची लिहिण्याची शैली अप्रतिम आहे हे मात्र खरंच. मी वर कादंबरीचं पहिलंच वाक्य दिलेलं आहे. जवळजवळ सगळी कादंबरी एलिझाबेथ बेनेटच्या दृष्टीकोनातून लिहिलेली आहे. बहुतांश घटना तिच्या उपस्थितीमधे घडतात. निवेदिका म्हणून लेखिकेची वर्णनं जिथे येतात ती एलिझाबेथने केलेली आहेत असं समजून मी बहुतांश कादंबरी वाचली. (हे माझं मत ठार चुकीचं असल्यास चूभूदेघे.)
"प्राईड अँड प्रेजुडीसचं भाषासौंदर्य" यावर गेल्या २०० वर्षांत किती रीसर्च पेपर झाले असतील देवास ठाऊक. अमीर उमरावांची भाषा म्हणून ती त्या समाजाचं वास्तव चित्रण करणारी - आणि म्हणून त्या अंगाने ग्रेसफुल - ती आहेच. पण आपल्या वर्गापुरतंच मर्यादित चित्रण करताना जेन ऑस्टीनचा उपरोध, विसंगती टिपण्याची क्षमता, ती विसंगती व्याजोक्तीने, आब राखून, मिष्कील पद्धतीने एखाद्या बुद्धीमान व्यक्तीने टिपावी याची उदाहरणं पहिल्यापासून शेवटाच्या पानापर्यंत दिसतात. संवाद रचण्याचं लेखिकेचं कौशल्य अजोड आहे. बटबटीतपणा, घिसाडघाई, अप्रस्तुत बोलणं, तोल ढळणं, या प्रकाराला जेन ऑस्टीनच्या लिखाणात स्थान नाही. एकंदर जेन ऑस्टीनचं जगच बर्यापैकी त्या उमरावी वर्गाने बंदिस्त केलेलं. त्या जगातल्या खलप्रवृत्तीच्या वाटणार्या व्यक्तींची वर्णनंसुद्धा खलत्वाशी अगदीच दूरान्वयाने संबंध असलेली. फारफार तर खोटं बोलणारी माणसं ती वाईट. याहून अधिक खलत्वाचं चित्रण नाही.
आणि एकंदरच तत्कालीन कादंबरीमधे नोकर येतात, जातात त्यांचं कुठेही अर्थपूर्ण असं दर्शन नाही. जणू ते अदृष्य आहेत. कुठेही हे उमराव आणि त्यांची पिलावळ आपल्या वर्गाच्या बाहेरच्या वर्गाबाहेरच्या कुणाशी साधं बोलतानाचं चित्रण मला आठवत नाही. आपल्याच वर्गात कोण उच्च आणि कोण खालचे याची सदोदित चर्चा करणार्यांची चित्रणं येत राहातात. अगदी एखादा माणूस जमीनधारी उमराव नसून व्यवसाय किंवा कामधंदा करून उपजीविका करणारा असला तर - अगदी तो कितीही सुखवस्तू असला तरी - उमरावी जिभा लगेच त्याबद्दल उपहासाने वळवळणार. (अर्थात असं करणार्यांबद्दल आत्यंतिक उपरोधाने लेखिका लिहिते. अशा प्रकारच्या pettinessचं विसंगतीयुक्त आणि मार्मिक चित्रण ही जेन ऑस्टीनची सर्वात अधिक परिणामकारक , शक्तीमान बाजू.) कादंबरीतले जे काही संघर्ष, ताणेबाणे आहेत ते लग्नं जुळवण्यापुरते. कुठल्या व्यक्तीचे कुणाबद्दल काय समज गैरसमज झालेले असतील त्याचे. "आधी तो मला असा वाटला पण आता असा वाटतोय" अशा प्रकारची रेलचेल असलेली वर्णनं. या दृष्टीने, २०व्या शतकाच्या सुरवातीला गडकरी वगैरे लोकांनी लिहिलेल्या "सामाजिक आशयाच्या" मराठी नाटकांमधल्या नायकांची नायिका मिळवण्याकरताची धडपड असलेली कथानकं आठवतात. मात्र, गडकर्यांसारख्यांचा sense of Evil बर्यापैकी ठाशीव आणि एकंदर कथानकाला गडद रंग देणारा होता. जेन ऑस्टीनमधे म्हणजे गडद छटा जवळजवळ नाहीच! इथे एकमेकांना दुखवण्यातून फारफार तर नशीबात काय येतं ते हिरमुसलेपण. जगण्यामरण्याचा संघर्ष - किमान या कादंबरीत - विशेष असा काही नाही. post-colonial ,फेमिनिस्ट लोकांनी ऑस्टीनच्या कायकाय चिंधड्या उडवल्या असतील त्या कधीकाळी वाचायला मजा येईल. :-)
( त्याकाळी - म्हणजे अगदी २०० वर्षांपूर्वी - स्त्री पुरुषांमधे मैत्री होणं, एकमेकांशी उघडउघड गप्पा मारू शकणं, तरुण तरुणींनी नृत्यात एकमेकांचा हात मागणं, सतत पार्ट्या करणं, प्रत्यहि एकमेकांबरोबर नृत्यं करणं - हे सर्व वाचताना , आमच्या काळी मुलामुलींच्या साध्या बोलण्यावर बंदी किंवा किमान भ्रूकुटीभंगाचा धोका असल्याच्या आठवणी येऊन, तत्कालीन डार्सी आणि इतर नायकांबद्दल तीव्र मत्सर दाटला होता हे येथे प्रामाणिकपणें नमूद करणं आवश्यक आहे :-) )
Every artist or author is a product of their times. जेन ऑस्टीन त्याला अपवाद नाही. २०० वर्षांनंतर, आख्खं विसावं शतक उलटून गेल्यावर, त्या शतकामधे ब्रिटीश साम्राज्यच नव्हे तर अखिल जगाचा निरागसपणाच लयाला गेल्यासारखा झाल्यानंतर जेन ऑस्टीन वाचणं यामागे एक गमतीशीर विसंगती आहे. मात्र जेन ऑस्टीनच्याच ग्रेसफुल नजरेने आपण या - अगदी ढळढळीत असलेल्या - विसंगतीकडे दोन घटका पाहू शकतो. त्या विसंगतीला काही काळ बाजूला ठेवून एका बुद्धीमान, शैलीदार, आपल्या समाजावर आसूड न ओढणार्या परंतु मिष्किल नजरेने त्यावर टिप्पणी करणार्या, विवेकी पण तीव्र संवेदनशीलतेच्या, जेन ऑस्टीनची जणू Alter ego असलेल्या, एलिझाबेथ बेनेटच्या जगाचा एक भाग बनू शकतो. डार्सी आणि एलिझाबेथच्या नाजूक पण एकमेकांच्या हृदयीच्या तारांशी एकमेकांनी चालवलेल्या खेळामधे घटकाभर तल्लीन होऊन राहू शकतो. तशा तर अनेकानेक पलायनवादी गोष्टी आपण ऐकतो-वाचतो-पाहतो- करतो. ऑस्टीनच्या तात्कालिक सामाजिक संदर्भांनी बांधल्या गेलेल्या, त्या काळाचा अपरिहार्य भाग असलेल्या या कादंबरीला मी escapist reading म्हणणार नाही. भाषिक सौंदर्याचा नमुना म्हणून ऑस्टीन अजोड आहे. उत्तम कशीदाकाम केलेल्या एखाद्या भरजरी उंची वस्त्राला स्पर्श करावा, घटकाभर ते ल्यावं अशा धर्तीचा हा अनुभव आहे.

No comments:
Post a Comment