Saturday, April 10, 2010

"दुष्काळ आवडे सगळ्यांना"

".. या पुस्तकातली माणसं म्हणजे भारतीय समाजाच्या एका भल्या मोठ्या हिश्शाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीवनावर हुकूमत गाजवणार्‍या लोकसंख्येतलं प्रमाण फक्त १० टक्के आहेत. पण त्यांच्यापेक्षा कितीतरी विशाल अशा या समाजघटकापर्यंत उच्चभ्रूंच्या दृष्टीचा पल्ला पोचत नाही. आणि त्या समाजाशी संबंध तुटलेल्या वृत्तपत्रांची, माध्यमाची झेपही तिथपर्यंत जात नाही."

हे शब्द आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पत्रकार, २००७ च्या मॅगसेसे पुरस्काराचे विजेते पी.साईनाथ यांचे. "Everybody loves a good drought" या त्यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादातून वरचा उतारा घेतलेला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहास विषयात एम.ए. ही पदवी मिळवल्यानंतर ते १९८० साली युनायटेड न्युज ऑफ इंडीया या वृत्तसंस्थेत वार्ताहर म्हणून रुजू झाले. पुढे "द डेली" या दैनिकात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संपादक आणि "द ब्लिट्झ" या साप्ताहिकात उपमुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९३ साली त्यांना भारताच्या ग्रामीण भागातल्या दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी "टाइम्स ऑफ इंडिया"ची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी केलेले हे संशोधन जगभर नावाजले गेले. त्या संशोधनातून जन्माला आलेला रिपोर्ट म्हणजे हे पुस्तक.

गरीबी आणि विवंचना यांची वर्णने बहुदा घटनेच्या रूपात आपल्यासमोर येतात. म्हणजे एखादी आपत्ती कोसळते , लोक मृत्यू पावतात, तेव्हा. पण गरीबी म्हणजे केवळा भूकबळी किंवा दुष्काळजन्य परिस्थिती नव्हे. अनेक घटनांच्या एकत्रित परिणामातून गरीबी जन्माला येते. त्यात प्रदेश, समाज , संस्कृती यांमधल्या भिन्नतेतून घटकांचं वजन कमी जास्त होतं. पण गाभ्याशी ठराविक घटकच असतात. त्यात उत्पन्न, पोषणद्रव्यं यांचबरोबर , जमीन, आरोग्य, शिक्षण, साक्षरता , बालमृत्यूचं प्रमाण आणि अपेक्षित आयुर्मान यांचाही समावेश होतो.

गरीबीकडे एक घटना न पाहता प्रक्रिया म्हणून बघणं हे या पुस्तकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. म्हणूनच हे पुस्तक वाचणं हा एक दाहक अनुभव ठरतो.घटना घडून जाते, इतर घटनांच्या मागे दडून जाते. प्रक्रिया सततची असते. ती आहे, हे एकदा मान्य झालं की तिची दखल घेणं हे आवश्यकच ठरतं. गरीबीकडे घटना म्हणून बघताना नेमकं हेच आपण आपल्या नकळत टाळत असतो. प्रस्तुत पुस्तकासारखे दस्तावेज नेमके हेच साधतात.

साईनाथ म्हणतात , "गरीबीची व्याख्या, दारिद्र्यरेषा, गरीबीच्या प्रमाणाची वेगवेगळया संदर्भांमधली आकडेवारी या सर्व गोष्टींचे महत्त्व मला मान्य होतेच ; परंतु मला आकड्यांवर नव्हे तर माणासांवर प्रकाश टाकायचा होता. यांचा एकमेकांशी संबंध नाही असे मला बिलकुल म्हणायचे नाही."

भारतातल्या गरीबांपैकी ४० टक्के भूमीहीन शेतमजूर आहेत. ४५ टक्के अल्पभूधारी शेतकरी आहेत. ७.५ टक्के ग्रामीण कारागीर. बाकीचे "इतर" वर्गातले. साईनाथांचा अभ्यास पहिल्या दोन वर्गांचा आहे.

पुस्तकातल्या विभागांची शीर्षके मोठी मार्मिक आहेत. एकेका विभागामधे एकेका वर्गाची उदाहरणे आहेत. प्रत्येक उदाहरणामधून दिसते अनास्था, धोरणांचा ढिसाळपणा, अंमलबजावणीचा अभाव , आरोग्य सेवेच्या नावाने चालवली गेलेली चेष्टा , हिवतापासारख्या रोगांमधे सतत होत असलेली वाढ, शिक्षणाच्या निधीचे गायब होणे. एक आख्खा विभाग आहे "विकास प्रकल्पांच्या" बळींचे. राहत्या घरातून , कसत्या जमिनीतून उचकटले गेलेल्यांचा लेखाजोखा. जंगलांची, पाना-वृक्षांच्या नाशाचे एकेक अध्याय. जर का भ्रष्ट , हावरट यंत्रणेकडून काही शिल्लक राहिलेले असेल तर उरलेल्यातून जी अंमलबजावणी होते त्यामधे निर्बुद्धपणा नि अनास्था यांचे भीषण मिश्रण आढळते. या अशा अंमलबजावणीतून गुराढोरांच्या जातीप्रजातीपासून, जंगलांपर्यंतचा नष्टांश आणि नको असलेल्या रस्त्यांपासून भलत्याच ठिकाणी कुपोषिताना दिल्या गेलेल्या सायकलींपर्यंतच्या कहाण्या.

कल्याणकारी योजना म्हणजे तर पळवाटीचे डावपेचच. जनतेला जेव्हा जमीनसुधारणा देता येत नाही तेव्हा संकरित गायी दिल्या जातात (ज्यांच्या प्रजाती लवकरच मरतात) शिक्षणाकरता शाळा देता येत नाहीत तेव्हा "पठडीबाहेरच्या" शिक्षणाचे प्रयोग केले जातात.

लक्षांत घ्या. हे सर्व किस्से नव्हेत. कथा नव्हेत. एका माणसाने दुर्गम भागांमधे जाऊन, प्रत्यक्ष लोकांना भेटून, त्याकरता सुमारे १ लाख किलोमिटरचा प्रवास चार वर्षे करून हा अहवाल बनवलेला आहे.

पुस्तकाच्या शेवटचा उपसंहार डोळ्यांमधे झणझणीत अंजन घालणारा आहे. "पंधरा टक्क्यांनी मिळून केलेली पंचाऐंशी टक्केवाल्यांची फसवणूक" इतक्या परिणामकारकरीत्या क्वचित मांडली गेली असेल. हे सर्व लिहिताना साईनाथ कुठे भडक होत नाहीत. जे सांगायचे आहे त्याकरता छद्माचा आधार त्याना घ्यावा लागत नाही. जे आहे ते समोर आहे. प्रत्यक्ष उदाहरणे आहेत. दाखले आहेत. निव्वळ आकडेवारी नव्हे.

एका माणसाने एकहाती केलेले हे काम छाती दडपून टाकणारे. आज साईनाथ यांची प्रतिमा म्हणजे, भारतातल्या विवेकाचा आवाज अशी आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमधे आणि परीषदांमधे त्यांना आमंत्रण असते , लिखाण चालू असते.

अशा या दस्तावेजाला मराठीमधे आणल्याबद्दल आपण हेमंत कर्णिकांचे ऋणी असायला हवे.

"दुष्काळ आवडे सर्वांना"
मूळ लेखक : पी. साईनाथ.
अनुवाद : हेमंत कर्णिक
अक्षर प्रकाशन
किंमत ३००/- रुपये.

पी साईनाथ विकी : http://en.wikipedia.org/wiki/Palagummi_Sainath

3 comments:

Dhananjay said...

Unfortunately very few ppl read such good books! Good write up.

अभिजीत वाघ said...

pustak parichay aavadala.
thanks.

Amol said...

Nice summary. This is an awesome book.