खरं तर 'रॉय' हे क्रिश्चनांमधे , अमेरिकनांमधे माणसाचं नाव असतं हे मला माहिती नव्हतं. (रॉय कॅम्पबेल वगैरे नावं मी नंतर वाचली.) त्यामुळे रॉय विल्सन हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा गंमत वाटली होती. रॉयचा नि माझा परिचय झाला ती गोष्ट योगायोगाची म्हणता येईल.
आम्ही आमच्या पहिल्या घरात राहात होतो. घर लहान असले तरी तेव्हा आम्ही दोघेच असल्याने पुरेसे होते. घरात पहिले छोटे पाहुणे येणार याची चाहूल लागली आणि या घराचे बेसमेंट फिनिश करून घ्यावे असा विचार मनात घोळायला लागला होता. या संदर्भात कायकाय करावे लागते , एकंदर खर्च काय येतो याची चौकशी मी केली. वेगवेगळ्या स्वरूपाची एस्टीमेट्स घेतली. कामाचे स्वरूप आणि प्रमाण पाहता माझ्यासारख्याला हे झेपणार नाही याची खूणगाठ तर मी बांधलेलीच होती.
उन्हाळ्याचे दिवस. मी घरासमोर कसले तरी छोटेमोठे काम करत होतो. आमच्या शेजारच्या घराला शिडी लावून एक माणूस काम करत होता. वर्णाने काळ्या असलेल्या या माणसाला मी याआधी कधी पाहिले नव्हते; त्यामुळे हा कुणी कामकरी आहे हे मला जाणवतच होते. घराच्या कौलांचे कसलेसे काम चाललेले होते. मी हातातले काम करता करता त्याला हलो म्हणालो नि त्यानेही प्रतिसाद दिला. माझे काम संपवून मी घरात आलो नि मला काय वाटले कोण जाणे, मी परत बाहेर आलो नि त्याला विचारले , "तू कसली कसली कामं करतोस ?" त्याने काम थांबवले नि तो म्हणाला , "मी कुठलीही कामं करतो, कॉन्ट्रॅक्टिंग ची". मग मी म्हणालो , "आमचे बेसमेंट फिनिश करायचा माझा विचार आहे". तो म्हणाला, "थोड्या वेळाने मी आत येतो नि एकदा पाहून जातो."
थोड्या वेळाने बेल वाजली. दारात हा गडी. एकंदर अमेरिकन लोकांचा सरसकट अंदाज येणं कठीण , पण हा पंचेचाळीस-पन्नासचा असावा. दणकट बांधा, मध्यम उंची. उन्हात काम करून घामाघूम झालेला. काहीसे मळकट कपडे घातलेले. घरात आल्यावर मी त्याला खाली नेले. त्याने एकंदर पाहाणी केली नि तो वर आला. " मी तुला माझे एस्टिमेट देतो." असं म्हणून गेला. जाताना माझा फोन नंबर घेऊन गेला.
पुढच्या शनिवारी मला फोन करून दुपारच्या वेळी आला. यावेळी त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा होता. तोही कृष्णवर्णीयच. रॉयने दिलेले एस्टीमेट मी पाहिलेल्या आताच्या एस्टीमेट्पेक्षा निश्चितच कमी होते. त्याने या एस्टीमेट्बरोबर आधीच्या क्लायंट्सनी दिलेली शिफारसपत्रेही आणलेली होती. प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक फिटींग ची कामे तो इतराना देणार होता - थोडक्यात आउटसोर्स करणार होता.
हे काम मी रॉयला दिले. पुढच्याच आठवड्यात काम सुरु झाले. एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली होती. रॉय कधीच एकटा ड्राईव्ह करून येत नाही. त्याच्याबरोबर कुणीतरी असतंच. त्याला राईड देणार्या व्यक्ती त्याच्याबरोबर काम क्वचितच करतात. बहुतांशी त्याला सोडण्यापुरत्याच त्या येतात. सामान आणणे/नेणे याकरता लागणारा मोठासा ट्रक रॉयपाशी नाही. पुढे सुमारे महिनाभर चाललेल्या या कामादरम्यान रॉयचे आमच्या घरी येणे अपरिहार्य होतेच; पण काही प्रसंगी त्याला मधूनच बाहेर पडावे लागणेही आवश्यक असयाचे. अशा वेळी त्याला ने आण करणार्या लोकांची वाट बघण्याऐवजी मीच त्याला नेऊ आणू लागलो. यात माझा वेळ जायचा खरा पण एकंदर काम वेळेत होण्याकरता ही नैमित्तिक गैरसोय मी सहन केली.
त्याला नेण्याआणण्याच्या दरम्यानच माझा नि रॉयचा संपर्क अधिक दृढ बनला. आतापावेतो झालेले बोलणे कामापुरते होते. कामाचे स्वरूप आणि प्रमाण निश्चित करणे , पैशाची देवाणघेवाण , कामाच्या निरनिराळ्या अवस्था, त्याची प्रगती वगैरे. त्याला नेता आणताना एकमेकांबद्दल थोडे बोलणे झाले.
"सो, रॉय. तू ड्राईव्ह करत नाहीस. ही काय भानगड आहे ?"
"काय सांगू ? माझी होती गाडी काही वर्षांपूर्वी. आता नाही."
"काय झालं ?"
"अरे काय सांगू. दारू पिऊन गाडी चालवत होतो. पोलिसाने पकडलं".
"बाप रे. ड्रंक ड्रायव्हिंग. किती वर्षं झाली ?"
"झाली ना पाचेक वर्षं. नक्की आठवत नाही आता."
"पाच वर्षं !! ड्रंक ड्रयव्हिंग करता पाच वर्षं !"
"आय डिड टाईम मॅन".
हॉलिवूडपट पाहिल्याने याचा अर्थ मला माहितीच होता. मी दोन मिनिटं स्तब्ध.
"दारू प्यायल्याबद्दल डायरेक्ट 'आतमधे' !?"
"अरे.. मी निव्वळ दारू प्यालो असतो तर ठीक आहे. पण झालं असं की मी पोलिसाशी भांडलो."
"अरे , तुला तर माहिती आहे, इथे आर्ग्युमेंट चालत नाही बाबा. पण एकदम जेल ?"
"नाही... भांडण नुसतं शाब्दिक नव्हतं"
बाबौ.
त्याने माझं मन जणू वाचलं. तो पटकन म्हणाला ,
" हे मॅन. डोंट वरी. त्यानंतर माझं रेकॉर्ड एकदम क्लीन आहे. तू ती रेकमेंडेशन लेटर्स वाचलीस ना ?"
त्यानंतरच्या दिवसांमधे मी थोडा काळजीमधे होतो खरा.
एकंदर काम पार पडले. दिलेल्या एस्टीमेट्च्या खर्चापेक्षा किंचितच अधिक खर्चात ; पण एस्टिमेट मधे दिलेल्या वेळेच्या नक्कीच अधिक वेळेत. रॉयकडे वाहन नव्हते हेच त्याचे उघडउघड कारण होते. पण फार भयंकर उशीर झाला नाही आणि एकंदर कामाचा दर्जा समाधानकारक होता.
हे काम चालू असताना काही प्रसंग असे आले की काम उशीरापर्यंत चालायचे. अशावेळी रॉयला घरी सोडायचा प्रसंग आला. या सर्व प्रवासात माणसे हळुहळू एकमेकांशी बोलायला लागतात , मोकळी होतात तेच आमचेही झाले.
"मग रॉय, तुझं वय काय रे ?"
"मी बावन्न वर्षांचा आहे. "
"वॉव. तुझ्यापेक्षा पंधरा-सतरा वर्षांनी लहान आहे मी"
"हो मला दिसतंच आहे. तुला तर मुलंही झाली. आम्ही तसेच."
"अरे मुलं म्हणजे.. दोन एकदमच ना ! नाहीतर एकच तर असतं."
"मुद्दा तो नाही आहे, आणि तुलाही माहिती आहेच" - इति रॉय.
"अँड व्हॉट इज द पॉईंट रॉय ?" - मी.
"अरे दोन ब्यागा घेऊन येता तुम्ही. घरं बांधता. लगीन करता. मुलं होतात तुम्हाला. पुढची पीढी आता इथेच. आणि आम्ही काळे लोक. चोर्यामार्या करतो. एकंदर रखडतो. "
हम्म. जी गोष्ट मी ऑफिसातल्या गोर्या माणसांच्या नजरेत वाचतो तीच गोष्ट एक कामकरी वर्गातला काळा माणूस विनासंकोच सांगत होता.
"अरे रॉय, हे खराय की आमच्या गाड्या नि घरं दिसतात. पण गाडी तर सगळ्यांची असतेच ना अमेरिकेत."
हे बोललो नि मनातल्या मनात जीभ चावली. काही क्षण गेले.
"अरे, तू काय मुद्दाम बोलला नाहीस मला माहिती आहे. घाबरू नको. धिज ब्लॅक मॅन इज नॉट गोईंग टू जंप यू. रिलॅक्स."
आम्ही दोघेही हसायला लागलो.
"रॉय अरे इतर सगळ्यांप्रमाणेच आम्हीही मॉर्ट्गेज घेऊनच घरं घेतो बाबा. आयुष्यभराचं कर्ज."
"हो ना. पण त्याच्याकरता देशाबाहेरून आलेल्या तुम्हा इंड्यन आणि चायनीज माणसाना सरकार पैसे देतं ना !" - इति रॉय.
बाबौ !
"वोह वोह वोह रॉय. व्हॉट आर यू टॉकिंग अबाऊट मॅन !"
"तुला ठाऊकाय मी काय म्हणतो ते. पैसे मिळतात ना तुम्हाला सरकार कडून. आम्हा काळ्यना काही नाही !"
या पुढचे सगळे संभाषण त्याला "असले काही नसते" हे सांगण्यात गेले.
रॉयला नेण्या आणण्याच्या दिवसांत त्याचं राहातं घर मी एकदा पाहिलं होतं. एका मध्यमवर्गीय भागातल्या घरात पेईंग गेस्ट म्हणून तो राहायचा. त्याला सोडायला घरात गेलो तर त्याच्या घरमालकीण बाईना हलो म्हण्टलं. सत्तरीला आलेली एक गोरी अमेरिकन बाई. एकटीच राह्यची. तिला रॉयची भरपूर मदत व्हायची. आणि बहुदा रॉयकडून ती घेत असलेले भाडे बरेच कमी असावे.
रॉयची पहिली ओळख नि पहिले काम करवून घेणे या गोष्टीना सुमारे आठ वर्षे झाली. या नंतरच्या काळात माझ्या नि रॉयच्या वर्षाकाठी किमान चार पाच भेटी तरी झाल्याच. भेटी कामानिमित्तच व्हायच्या. काही कामे वर्षाकाठची तर काही नैमित्तिक. यातून रॉयच्या आयुष्यात झालेले बदल मला कळत नकळत जाणवत होते. मी दिलेल्या कामामुळे त्याला एक जुनाट का होईना , पण गाडी घेता आली. काय मौज आहे पहा. माझ्या कामादरम्यान गाडीची नितांत गरज होती पण गाडी घेता आली काम संपल्यावरच. पण त्यामुळे का होईना यापुढच्या भेटीत त्याला गाडीतून नेण्या आणण्याचे प्रसंग काही काळ आले नाहीत.
हळुहळू , मला असा कुणीतरी स्वस्तात काम करून देणारा माणूस भेटला आहे या गोष्टीची खबर - जशी कुठल्याही डीलची खबर सर्वात आधी जिथे पोचते त्या - माझ्या देसी बांधवांपर्यंत पोचलीच. यांपैकी कुणी मग रॉयला डेक दुरुस्त करण्याचे , तर कुणी बाथरूम चे तर कुणी बगिच्याचे काम दिले. अशा प्रकारे , रॉयला नियमित काम मिळवून देण्यात मदत केल्याबद्दल रॉयचा आणि प्रसंगी सस्त्यात काम करून मिळाल्याबद्दल माझ्या देशबांधवांचा दुवा मी मिळविला. अर्थात क्वचित प्रसंगी या पुष्पगुच्छांबरोबर वीटाही खाव्या लागल्या.
"अरे रॉय, तू त्या अमक्याअमक्याबरोबर काय भांडण केलेस ?"
"म्हणजे ? तू त्याला ओळखतोस ?"
"रॉय , तो इंडियन आहे !"
"आय शुड हॅव नोन. नाहीतर मला कुणा इंडियनकडून कॉल येईल कसा !"
"अरे पण काय झालं ?"
"यू इंडियन्स. यू गाईज थिंक यू आर बेटर दॅन अस."
"रॉय. लास्ट आय चेक्ड, मी पण इंडियन आहे"
"नॉट यू मॅन . आय नो यू डोंट थिंक लाईक दॅट".
(मी मनातल्या मनात : "दॅट्स प्रॉबेबली बीकॉज आय अॅम नॉट बेटर दॅन यू".)
"बट दॅट गाय मॅन. ही वॉज टॉकिंग टू मी लाईक आय अॅम स्टुपिड !" - रॉय.
"हाऊ डू यू नो रॉय ? "
" अ ब्लॅक मॅन नोज , रॉज !" - इति रॉय.
हो ते सांगायचं राह्यलंच : त्याला राज हे माझे घासून गुळगुळीत झालेले संक्षिप्त नाव कधी म्हणता आले नाही. तो नेहमी "रॉज" "रॉज" करतो.
असो. आमच्या आतापर्यंतच्या सहवासात असे अनेक संवाद झडले. अमेरिकन समाजात असलेले कन्व्हेन्शनल विस्डम , पोलिटिकल करेक्टनेस या गोष्टी त्याच्याकडे अभावाने आहेत हे आतापावेतो मला नीट समजलेले आहे. मात्र असे असूनही त्याच्याकडून मी नक्कीच काहीतरी शिकलो आहे. काही तांत्रिक गोष्टी तो कसा करतो आहे हे नीट पाहून शिकलो नि नंतर त्या गोष्टींकरता परत त्याला बोलावले नाही. म्हणजे थोडक्यात , भारतीय कंपन्या जे करतात तेच मी करत आहे की ! अर्थात काही अंगमेहनतीच्या किंवा किचकट कामांकरता त्याला कधीतरी बोलावणे होतेच.
रॉयच्या निमित्ताने एक निराळी अमेरिका मी पाहतो. आतापर्यंत पाहिलेली अमेरिका ऑफिसमधली किंवा शेजारपाजारचे लोक किंवा आता मुले थोडी मोठी होऊ लागल्यावर त्याच्या वर्गातल्या मुलांचे पालक. हे सर्व लोक पांढरपेशा आहेत. त्यांचे प्रश्न , त्यांची त्यानी शोधलेली उत्तरे , त्यांचे जीवनमान, चालीरीती टिपिकल अमेरिकन सबर्बिया मधल्या. रॉय आणि त्याच्या अनुषंगाने भेटलेल्या लोकांची दुनिया वेगळी. विकसित देशांमधेही एकंदर विकासाची फळे न चाखलेल्या , रस्ता हरवलेल्या नि सदा रस्ता शोधावा लागलेल्या लोकांकडे पाहायची माझी खिडकी म्हणजे रॉय. आजही अमेरिकेत असे रॉय आहेत ज्यांच्याकडे कवडीचेही सेव्हिंग नाही. त्यांचं पोट अक्षरशः हातावर असतं. एकदा अनेक आठवडे रॉयने माझ्या फोन कॉलना नि मेसेजेस ना उत्तर दिलं नाही. तेव्हा कळलं तो कुठे काम करत असताना पडला. हॉस्पिटलमधे होता. इन्शुरन्स वगैरे असण्याचा काही संबंध नव्हता. आता त्याला सुमारे साठेक हजारांचे बिल फेडायचे आहे. कितीतरी वर्षांत तो डेंटिस्ट कडे गेलेला नाही. इतकंच काय , कितीतरी वर्षांत त्याने टॅक्स भरण्यासारखी मूलभूत गोष्ट केलेली नाही.
अशा व्यक्तींची सामाजिक, राजकीय मते हा एकंदर मजेदार प्रकार असतो. दोन वर्षांमागे ओबामा निवडून आल्यावर मी रॉयला विचारले. तो म्हणतो :
"मला त्याचे काय ? आणि हे लोक तर बहुदा त्याला मारूनच टाकतील."
"हे लोक ? कोण लोक ?" - मी.
"दीज व्हायटीज् , मॅन !".
एकदा कसलेही काम नसताना त्याचाच फोन मला आला. संध्याकाळी वेळ असेल तर भेटू म्हणून. मला काय वाटले माहिती नाही. मीही गेलो.
अंधारी खोली. त्यात रॉयचे दोन मित्र बसले होते. रॅपम्युझिक चालू होते. धूर भरलेला. माझी त्याने ओळख करून दिली. मी बीअर घेतली. रॉय ने मला जळती सिगरेट दिली.
"मी सिगरेट स्मोक करत नाही रॉय. तुला माहिती आहे."
"धिस इज नॉट सिगरेट मॅन."
"ओह. तरीच मला भयंकर वाटत होता वास मारियुआनाचा."
"धिस इज नॉट दॅट."
मी लगेच गाशा गुंडाळला. "अदिओस, वामोस". त्यानंतर परत पार्टीला जायची हिंमत केली नाही.
कधीकधी रॉयचा विचार करतो तेव्हा वाटतं , मार्क्सने ज्याचं वर्णन प्रोलिटॅरिएट असं केलं ते याच्यापेक्षा काय वेगळं असणार. रॉयसारख्या माणसांच्या हातून बोल्शेव्हिक क्रांती होईल असा एक गमतीदार विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. नारायण सुर्व्यांच्या कविता वाचताना "भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली" असे शब्द येतात. याचा नक्की अर्थ काय याचे जिवंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. रॉयच्या आईला मी एकदा भेटलो आहे. थंड कोरड्या नजरेतल्या सर्व अपेक्षा संपलेल्या. दे गॉट नथिंग टू लूज. दे जस्ट गॉट नथिंग...
परवाच माझ्याकडे काही कामानिमित्त आलेला होता. माझी बायको मुलाना घेऊन जात होती. कुठे जात आहेत याची त्याने चौकशी केली. पोरं कसल्याशा सॉकर प्रॅक्टिस ला जात होती. "नाईस रॉज , नाईस. ब्लॅक किड्स वेअर देअर हूड्स अँड लर्न टू ब्रेक इन्टू समवन्स हाऊस. युअर किड्स गो टू सॉकर. हा हा हा"
मग नेहमी प्रमाणे आम्ही बसून एक बीअर घेतली.
Wednesday, March 9, 2011
Subscribe to:
Posts (Atom)